जिल्हा
रस्ता खचून शेड कोसळले, नारळाचे झाड जमीनदोस्त
रस्ता खचून शेड कोसळले, नारळाचे झाड जमीनदोस्त
फोटो: ठाणे वैभव
ठाणे पूर्वेतील जिजामाता मार्गावरील घटना
ठाणे: ठाणे पूर्वेतील जिजामाता मार्गावरील सर्वेश सोसायटीच्या नवीन बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास रस्ता अचानक खचला. या घटनेमुळे बांधकामाच्या संरक्षणासाठी उभारलेले शेड कोसळले, मात्र हे शेड रस्त्यावर न पडता बांधकामाच्या आतल्या बाजूस कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. या वेळी बाजूला असलेले नारळाचे झाडही उन्मळून पडले.
सकाळच्या वर्दळीच्या वेळेत ही घटना घडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. काही वेळासाठी नागरिक आणि वाहनचालक भयभीत झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुरू असलेल्या खोदकामादरम्यान योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा निष्काळजी बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बांधकामस्थळी आवश्यक त्या सुरक्षाव्यवस्था तातडीने करण्यात याव्यात, तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475