जिल्हा
झोपेत असलेल्या कुटुंबावर कोसळले घराचे छप्पर
झोपेत असलेल्या कुटुंबावर कोसळले घराचे छप्पर
फोटो: ठाणे वैभव
सुदैवाने जीवितहानी नाही
कल्याण: कल्याण पूर्वेतील मंगल राघो नगर, गणेशनगर भागात चाळीतील एका घराचे जीर्ण झालेले छप्पर कोसळल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
नरेश रंगारे हे आपल्या कुटुंबियांसह दुर्वांकुर सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या कौलारू घरातील जीर्ण झालेले व वाळवी लागलेले वासे तुटल्याने घरावरील छत उंचावरून खाली जमिनीवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नरेश रंगारे आपली पत्नी व तीन लहान मुलांसह चाळीतील कौलारू घरात राहतात. ते घरात झोपलेले असताना घराचे लाकडी वासे वाळवी लागल्यामुळे कमकुवत झाल्याने रविवारी सकाळच्या सुमारास घराचे छत कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून रंगारे कुटुंबीय सुखरूप बचावले, मात्र रंगारे यांच्या पत्नीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. रंगारे यांनी या अगोदरही वाश्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास कमकुवत झालेल्या वाशांना भिजलेल्या कौलांचा भार सहन न झाल्याने घराचे छत कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या घराचे घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.
300x450
300x600