महाराष्ट्र

विस्तारित रेल्वे स्थानक डिसेंबर २०२५मध्ये होणार सेवेत दाखल

विस्तारित रेल्वे स्थानक डिसेंबर २०२५मध्ये होणार सेवेत दाखल
विस्तारित रेल्वे स्थानक डिसेंबर २०२५मध्ये होणार सेवेत दाखल फोटो: ठाणे वैभव
खा.राजन विचारे यांनी केली पाहणी ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मुलुंड आणि ठाणे दरम्यान उभारण्यात येणारे विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक डिसेंबर २०२५मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खा. राजन विचारे यांनी दिली. ठाणे-मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाचे काम रेंगाळत असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज खा.श्री.विचारे यांनी काम सुरू असलेल्या नविन रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोधे, श्रीमती आसावरी, मध्य रेल्वेचे प्रकल्प निर्माण विभागाचे उप मुख्य अभियंता रिजवान अहमद, कार्यकारी अभियंता सतीशचंद, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मुळीक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश परदेशी, तहसीलदार मंडळ अधिकारी शशिकांत जगताप आदी उपस्थित होते. मुंबईनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमधील सर्वाधिक गर्दीचे ठाणे स्थानक गणले जात आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज सात ते आठ लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवाशांचा वाढता भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने वागळे, घोडबंदर रोड येथिल वाढते नागरिकरण लक्षात घेऊन ठाणे आणि मुलुंड दरम्यान विस्तारित रेल्वे स्टेशन निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सन २०१४ साली पहिल्याच अधिवेशनात शून्य प्रहरामध्ये लोकसभेत ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचा मुद्दा उपस्थित केल्याचे खा. विचारे यांनी ठाणेवैभवच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१५ रोजी तत्कालीन ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल असताना ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामास स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून या कामास २८९ कोटी निधीही उपलब्ध करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे बैठका आणि पत्रव्यवहार करून मे २०१६ला मध्य रेल्वेची या नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळवली. त्यानंतर जागेसाठी पाठपुरावा सुरू केला. ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन अनेक प्रस्ताव शासकीय आरोग्य विभागाकडे ठेवण्यात आला. सन २०१० साली एक जनहित याचिका दाखल असल्यामुळे सदर जागेचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट असल्याने जागा मिळण्यास विलंब लागत होता. २०१८ साली ठाणे महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाकडे जागे संदर्भात दिलेल्या आदेशात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. याबाबत राज्य शासनाचे ॲड. जनरल यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. मार्च २०२३ ला उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्याने स्थानकाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. एप्रिल २०२३ मध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची जागा ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. परंतु मोजणी सुरु न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जागेची मोजणी करण्याचे कळविले. त्यानंतर संबंधित विभागाने रेल्वे स्टेशन फलाटे व इमारतीसाठी लागणारी 3.77 एकर जागेची मोजणी करून घेतली. त्यानंतर पुन्हा शासकीय आरोग्य विभागाने जागेवर असलेल्या अतिक्रमणाचा विचार करून मनोरुग्णालयाच्या जागेची संपूर्ण मोजणी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळविले, अशी माहिती श्री.विचारे यांनी दिली. आज या पाहणी दौऱ्या दरम्यान खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ मोजणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच मोजणी होईपर्यंत रेल्वे व ठाणे महापालिका या मधील करारनामा तत्काळ मंजुर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या, जेणेकरून ठामपाकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेला निधी रेल्वेला रक्कम भरून स्थानकाच्या इमारतीचे व रुळाचे काम सुरू करता येऊ शकेल. अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत करारनामा करून देऊ, असे सांगितल्याचे ते म्हणाले. कोपरी-आनंद नगरच्या दिशेला उतरणाऱ्या पादचारी पुलालगत असलेल्या डी पी रस्त्याचे काम तत्काळ सुरु करा, जेणेकरून कोपरी-आनंद नगर परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, अशा सूचना श्री.विचारे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण २० पैकी ११ पिलरचे काम पूर्ण झाले असून गर्डर व सॅटीस डेकचे काम सुरु असून ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन नवे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कसे असणार नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक? संपूर्ण ठाणे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला +२ मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे. या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे. या स्थानकात तीन पादचारी पुल असणार आहेत. परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. स्टेशन इमारतीसमोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस असणार आहे. 2.5 एकर जागेमध्ये चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे. त्यामध्ये स्टेशनला जोडणाऱ्या तीन मार्गीका असतील. पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून अप-डाऊन असणार आहे. त्या पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत. दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे. तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाकामार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे. नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच कर्जत-कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475