जिल्हा

चार महिने हरवलेला भाऊ अखेर कुटुंबाच्या कुशीत!

चार महिने हरवलेला भाऊ अखेर कुटुंबाच्या कुशीत!
चार महिने हरवलेला भाऊ अखेर कुटुंबाच्या कुशीत! फोटो: ठाणे वैभव
बिहारच्या तरुणाला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रयत्नातून दिल्लीत कुटुंबाशी पुनर्भेट; ठाणे: मुंबईत हरवलेल्या बिहारमधील एका तरुणाला तब्बल चार महिन्यांनंतर त्याच्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून आणण्यात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने यश मिळवले आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच समाजसेवा विभागाच्या जिद्दीमुळे आणि पोलिसांच्या समन्वयातून ही हृदयस्पर्शी पुनर्भेट शक्य झाली. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मानसिकदृष्ट्या विचलित अवस्थेत हा तरुण आढळून आला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला तो पूर्णपणे मौन अवस्थेत होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणावर उपचार सुरू केले. या रुग्णाचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी रुग्णाने आपले नाव सुरेंद्र शर्मा (नाव बदलून) असून तो बिहारमधील छपरा जिल्ह्यातील असल्याची माहिती दिली. त्यानंतर समाजसेवा अधिक्षक सतीश वाघ यांनी तत्काळ बिहार पोलिसांशी संपर्क साधून दाऊदपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन कुमार यांच्याशी समन्वय साधला. तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली. रुग्णाचे कुटुंब सध्या बिहारमध्ये नसून दिल्लीत स्थायिक झाले होते. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णाचे फोटो प्रसारित केले. ही माहिती पाहून एका स्थानिक व्यक्तीने रुग्णाच्या भावाचा, रितेशचा संपर्क क्रमांक पोलिसांना दिला. १३ जानेवारी २०२६ रोजी व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णाची ओळख पटवण्यात आली. त्यावेळी रुग्ण पूर्णपणे बरा नसल्यामुळे डॉक्टरांनी उपचार पूर्ण झाल्यानंतरच त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. या काळात रुग्णालय कर्मचाऱ्यांनी समुपदेशनाद्वारे रुग्णाला मानसिक आधार दिला. रुग्णाची सुरेंद्रची प्रकृती सुधारल्यानंतर त्याचा भाऊ रितेश रुग्णालयात दाखल झाला आणि भावनिक वातावरणात दोघांची पुनर्भेट झाली. “माझा भाऊ यापूर्वी दिल्लीतूनही हरवला होता, पण ठाणे मनोरुग्णालयाने त्याला शोधून काढून उपकार केले,” अशा भावना रितेश यांनी व्यक्त केल्या. या संपूर्ण प्रक्रियेत उपअधीक्षिका डॉ. प्राची चिवटे, वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष पाठक, डॉ.मनोज भिसे, नितीन शिवदे, मेट्रन माधुरी कांबळे, परिचारिका स्मिता राणे, रुपाली भगत, समाजसेवा विभागातील अधिकारी, तसेच परिचारिका व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475