जिल्हा

ठाणे ते मुंबई...एक 'हृदय'स्पर्शी प्रवास!

ठाणे ते मुंबई...एक 'हृदय'स्पर्शी प्रवास!
ठाणे ते मुंबई...एक 'हृदय'स्पर्शी प्रवास! फोटो: ठाणे वैभव
* हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर * 'व्हॅलेंटाइन डे'ला ठाणे वाहतूक पोलिसांची कामगिरी ठाणे: १४ फेब्रुवारी रोजी ठाणे शहर वाहतूक विभागाने अवघ्या काही मिनिटांत ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करून एका रुग्णासाठी हृदय सुरक्षितपणे मुंबईत पोहोचवले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय येथुन सायंकाळी ५.५५ वाजता ब्रेन डेड रुग्णाचे हृदय मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊन्डेशन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णासाठी रवाना करण्यात आले. ठाणे ते मुंबई हा सुमारे ३५.०७ कि.मी.चा प्रवास असून ठाणे हद्दीतील ज्युपिटर रुग्णालय ते आनंदनगर टोलनाका हा ६.०१ कि.मी.चा टप्पा पार करण्यासाठी वाहतूक पोलिसांना १४ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, दक्ष नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे ठाणे वाहतूक शाखेच्या पथकाने हा टप्पा अवघ्या आठ मिनिटांत पूर्ण करून हृदय वेळेत मुंबई हद्दीत रवाना केले. या ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे (कापुरबावडी), पोलीस निरीक्षक बारेला (वागळे), पोलीस उपनिरीक्षक महाडीक (नौपाडा) तसेच पोलीस उपनिरीक्षक हिंगे तसेच नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित पारधी व अन्य कर्मचारी वृंद यांच्या नेतृत्वाखाली २५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नियंत्रण कक्षातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रीन कॉरीडॉरच्या संपूर्ण मार्गावर काटेकोर बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीतपणे वळविण्यात आली. दरम्यान, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. संतोष सोरटे आणि त्यांच्या पथकाने वैद्यकीय दक्षता घेत हृदय सुरक्षित व सुस्थितीत रवाना करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ‘प्रेम’ आणि ‘मानवता’ यांचे खरे प्रतीक ठरलेल्या या कार्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेळेशी स्पर्धा करत जीव वाचवण्यासाठी केलेल्या या कामगिरीने पुन्हा एकदा ठाणे पोलिस दलाची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी मुंबईला रवाना करायचे आहे असा कॉल शनिवारी अर्धा तास आधी रुग्णालय प्रशासनाकडून आम्हाला आला. त्यानंतर तत्काळ अंमलबजावणी करत व्हॅलेंटाईन डे ला ठाणे ते मुंबई असा एका हृदयाचा प्रवास सुरु झाला. ते हृदय मुंबईपर्यंत ग्रीन कॉरिडॉरने पोहोचवण्यात आले. ठाणे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मुंबईच्या वेशीवर पोहचवण्यात आले. एखाद्याला जीवदान देण्यात ठाणे वाहतूक शाखेचेही योगदान लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असे पंकज शिरसाट यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475