जिल्हा
ठाणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव फक्त कागदावरच
ठाणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव फक्त कागदावरच
फोटो: ठाणे वैभव
कृत्रिम तलावांचा अपव्यय, खाड्यांत मूर्ती विसर्जन सुरूच
ठाणे: यंदा ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली. शहरभर लाखो रुपये खर्च करून कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले; पण भाविकांनी त्याकडे प्रतिसाद दिला नाही. अनेकांनी थेट खाडीतच मूर्ती विसर्जन केले.परिणामी कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय झाला आणि खाड्यांचे प्रदूषण वाढले. महापालिकेच्या मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ठाणे महापालिकेच्या वरवरच्या पर्यावरण उपक्रमांमुळे केवळ फोटोसेशन होत असले, तरी ठाणेकरांच्या श्रद्धास्थानी असलेल्या बाप्पाच्या मूर्ती अखेर प्रदूषणाच्या लाटेत बुडत आहेत. पीओपीसारख्या घातक मूर्ती पाण्यात मिसळून जैवविविधता उद्ध्वस्त करत आहेत. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका स्थानिक कोळी समाजाला बसत आहे. एकेकाळी मासेमारीतून संसार फुलवणारे कोळी आता पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या जिवनावर या विसर्जनामुळे गंडांतर येत आहे.
याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट स्मरणपत्र पाठवले आहे. यात त्यांनी कृत्रिम तलाव उपक्रमाचे अपयश अधोरेखित करताना म्हटले आहे की “सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवून प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. फक्त पत्रकं, जाहिराती आणि ढोलताशा यावर पैसे उधळून जनतेची दिशाभूल करणं बंद झालं पाहिजे. खाड्यांत विसर्जन रोखण्यासाठी कठोर कायदे, जनजागृती आणि व्यवहार्य उपाय हवेत. अन्यथा पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ कागदी घोषणा राहील.”
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475