महाराष्ट्र
ठाण्यासह सहा महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र
ठाण्यासह सहा महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात राजन विचारे, अविनाश जाधव यांच्यावर जबाबदारी
मुंबई: राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट राज्यातील सहा महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. मुंबई महापालिकेसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे.
माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील, अविनाश जाधव तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असणार आहे.
याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले, जबाबदाऱ्यांबाबत पक्षाने घोषणा केलेली नसली तरी ठाण्यात शिवसेनेतर्फे राजन विचारे आणि मनसेतर्फे मी जबाबदारी सांभाळत आहे. आम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांना विश्वासात घेऊन आणि कोणताही इगो मनात न ठेवता जागावाटप आणि इतर कामे पार पाडणार आहोत. त्यामुळे कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही.
मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसेच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे. परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475