जिल्हा

उड्डाणपुलांखालील बेघरांचे तंबू उठवले

उड्डाणपुलांखालील बेघरांचे तंबू उठवले
उड्डाणपुलांखालील बेघरांचे तंबू उठवले फोटो: ठाणे वैभव
'ठाणेवैभव'च्या वृत्तानंतर नवी मुंबई महापालिकेची मोठी कारवाई नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील सीवूड्स, दारावे अशा अनेक ठिकाणी उड्डाणपुलाखालील जागांवर भिकाऱ्यांनी ठाण मांडले होते. याबाबतचे वृत्त 'ठाणेवैभव'मध्ये झळकल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत या नागरिकांना हटवले आहे. नवी मुंबई शहरातील बेलापूर, सीवूड्स, नेरुळ आदी भागांतील उड्डाणपुलांखाली बेघर, भिकारी आणि स्थलांतरितांनी मोठ्या प्रमाणात ठाण मांडल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः सीवूड्स रेल्वे स्थानका बाहेरील उड्डाणंपूल, दारावे से २५, या जागांवर भिकाऱ्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले होते. उड्डाणपुलाखालील या जागांमध्ये अनेक बेघरांनी तात्पुरत्या झोपड्या उभारल्या होत्या. काही ठिकाणी महिलांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही राहत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचत होता. त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच रात्रीच्या वेळी या भागात असुरक्षिततेची भावना वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी वारंवार केली होती. याची गंभीर दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई हाती घेतली. नेरुळ, बेलापूर आणि एनआरआय पोलीस ठाण्यांच्या बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. पालिकेच्या पथकाने उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवत तेथील तात्पुरते निवारे आणि साहित्य हटवले असून एकूण सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी बेलापूर उड्डाणपुलाखाली घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर प्रशासनाने या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने अशा ठिकाणी अनधिकृत वास्तव्यास आळा घालणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे उड्डाणपुलाखालचा परिसर मोकळा झाला असला, तरी बेघर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कायम आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी निवाऱ्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांनीही शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने अशाच कारवाया कराव्यात, अशी मागणी केली आहे. आजची कारवाई ही चोख पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आली. यावेळी उड्डाणपुलाखाली वास्तव्य करणाऱ्या बेघरांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले. ही कारवाई सातत्याने सुरूच राहणार आहे, अशी माहिती बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत नेरकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475