जिल्हा

येऊरच्या ढाब्यांना टँकर; पाड्यांची सुरू वणवण

येऊरच्या ढाब्यांना टँकर; पाड्यांची सुरू वणवण
येऊरच्या ढाब्यांना टँकर; पाड्यांची सुरू वणवण फोटो: ठाणे वैभव
ठाणे: निसर्ग सौंदर्याने नटलेल्या येऊर येथील आदिवासी पाडे मागील आठ दिवसापासून तहानलेले असून या भागातील आदिवासी नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यामुळे मुलींना शिक्षण सोडावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येऊर भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांना ठाणे महापालिकेच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक पाड्यावर छोट्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत, परंतु मागील आठ दिवसांपासून येऊर येथील पाड्यांवर पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. पाणी नसल्याने आदिवासी महिला पुरुषांनी पारंपारिक झरे शोधण्यास सुरुवात केली आहे. या झऱ्यांच्या शोधात त्यांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. झऱ्याचे पाणी देखील दूषित आणि गढूळ असून त्यावरच त्यांची तहान भागवावी लागत आहे. याबाबत पाटोणापाडा येथील आदिवासी महिला म्हणाली की, आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे पाणी शोधण्यासाठी हंडे घेऊन जंगलातील झरे शोधून ते पाणी आणावे लागत आहे. ते पाणी गढूळ आहे, पण नाइलाजाने ते पाणी प्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एक शाळकरी मुलगी म्हणाली की महापालिकेचे पाणी येत नाही, त्यामुळे शाळा सोडून पाणी आणण्यासाठी जंगलात जावे लागत आहे. येथील एक आदिवासी युवक म्हणाला की पाणी नसल्याने मागील आठ दिवस अंघोळ केली नाही. आमच्याकडे पाण्याचे टँकर आणण्यासाठी पैसे नाहीत आणि महापालिकेला आमची काळजी नाही या भागातील हॉटेल आणि बंगलेधारक महापालिकेकडून पैसे खर्च करून पाण्याचे टँकर मागवत आहेत, मात्र आदिवासी पाण्यासाठी वणवण करत आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की शटडाऊन असल्याने तीन दिवस येऊर भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती, परंतु आत्ता मात्र पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. या भागात नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा सुरू आहे, असे सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475