जिल्हा
मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार
मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार
फोटो: ठाणे वैभव
थांबलात तर गुन्हा दाखल
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचे समोर आले आहे. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो.
मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारण्यात आला आहे. अशा ठिकाणी वाहन थांबवणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं ठरत आहे. महामार्ग पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी किंवा फोटो काढणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल.
पोलिसांकडून केवळ दंडच नव्हे तर गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हेही नोंदवले जाणार आहेत. सकाळपासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. कारवाई टाळायची असेल तर मिसिंग लिंकवर कुठेही न थांबता प्रवास करा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.
मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे. पूर्वी दररोज 10 ते 15 अपघात किंवा कोंडीबाबत कॉल येत होते, मात्र आता एकही कॉल नियंत्रण कक्षाला आलेला नाही.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475