जिल्हा

मान्सूनचे जोरदार आगमन; दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार

मान्सूनचे जोरदार आगमन; दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार
मान्सूनचे जोरदार आगमन; दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार फोटो: ठाणे वैभव
मुंबई: जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल पंधरा दिवस रखडलेल्या मॉन्सूनने पुन्हा वेग घेतला असून, मागच्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत मॉन्सूनने प्रगती केली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातील उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत मॉन्सून पुढे सरकला आहे. मुंबईसह राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात ८ जूननंतर मॉन्सूनचा प्रवास जवळपास ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक भागांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, शेतकरी तसेच नागरिकांना प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र, अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्याने आणि वातावरणातील पोषक स्थितीमुळे मॉन्सूनला पुन्हा चालना मिळाली आहे. २२ जून रोजी मॉन्सूनची उत्तर सीमा अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बलांगीर, सुंदरगड, चतरा, गया आणि मुझफ्फरपूर या भागांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह उर्वरित कोकणात पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील काही भागांतही पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा मोठी पर्जन्यतूट नोंदविण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या असून, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत मॉन्सूनच्या पुनरागमनामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील वारे अधिक बळकट होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. २२ ते २६ जूनदरम्यान राज्यातील बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरींचीही नोंद होऊ शकते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475