जिल्हा

टपऱ्या, गॅरेज, फेरीवाल्यांनी रस्ते-पदपथांची केली कोंडी

टपऱ्या, गॅरेज, फेरीवाल्यांनी रस्ते-पदपथांची केली कोंडी
टपऱ्या, गॅरेज, फेरीवाल्यांनी रस्ते-पदपथांची केली कोंडी फोटो: ठाणे वैभव
ही बेकायदेशीर संस्थाने कोणाची? ठाणे: आधी टेबल, मग टपरी, नंतर शेड मग दुकान आणि कारवाई झालीच तर फुकटचे पुनर्वसन, असे वामचक्र ठाणे शहरात पालिका अधिकारी आणि तथाकथित कार्यकर्ते यांच्या आर्थिक हीत संबंधामुळे राजरोस सुरू आहे. वाहतूक कोंडी टाळता यावी आणि पादचाऱ्यांना मोकळे रस्ते मिळावेत या उद्देशाने पुढील २५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनेक मुख्य आणि उप रस्ते रुंद केले. यावेळी नागरिकांनी सहकार्य केलेच, शिवाय अनेकवेळा आयुक्तांना नागरिकांचा रोषही पत्करावा लागला. या रुंद रस्त्यांचे वैभव मात्र पुढे प्रशासनाला टिकवता आले नाही. तथाकथित पक्ष कार्यकर्ते आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी संगनमत करून रस्त्या रस्त्यावर, नाक्यावर, वळण रस्त्यावर, आडोशाला फळे, भाज्या, स्नॅक्स, पुष्पगुच्छ, गॅरेजवाल्यांना व्यवसाय करण्यास जागा दिल्या. हळूहळू तेथे हातगाड्या, नंतर टपऱ्या, शेड, आणि अखेर दुकाने थाटली गेली. हप्ते मिळत असल्याने तक्रारी करूनही यावर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करू लागले आणि ही छोटी छोटी संस्थाने उदयास आली. पुढे कदाचित यावर कारवाई झालीच तर पुनर्वसन करून त्यांना हक्काची जागा देण्यात तत्काळ प्रक्रिया सुरू होते. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शहरातील रस्त्यांची पुन्हा कोंडी होऊन करदात्या ठाणेकरांना त्याचा नाहक त्रास होणार आहे. पाचपाखाडी भागात आई कलावती देवी मंदिरासमोर काही महिन्यांपूर्वी एका इडलीवाल्याने सायकल लावून व्यवसाय सुरू केला आता तेथेच गॅस सिलेंडर, छत्री आणि पदपथावर मोठी शेड असा संसार त्याने थाटला आहे. सतरंज वेफर्ससमोर अरुंद रस्त्याच्या लगतच भाजी विक्रेत्यांच्या गाड्या वाढू लागल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांची आणि त्यांच्या गाड्यांची गर्दी होते. आधीच अरुंद रस्ता त्यात या गर्दीमुळे कधी कधी वाहतूक कोंडीही होते. भक्ती मंदिर येथे टॉवर क्लॉकसमोरच पुष्प गुच्छ विक्रेत्यांनी पदपथावर ठाण मांडले आहे. या विक्रेत्यांनी थेट रस्त्यातच साहित्य मांडलेले असते. खरेदीदारांची आणि त्यांच्या वाहनांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. खाऊ गल्लीसमोर, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, रायगड गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, सीता माऊली सोसायटीच्या गेटजवळच फळ विक्रेत्यांनी मोठी जागा व्यापली आहे. या आणि अशा अनेक बेकायदेशीर टपऱ्या, दुकाने यांच्याबाबत या आधी अनेक तक्रारी झाल्या आहेत, मात्र हफ्ते बाजीमुळे यावर कारवाया झाल्या नाहीत, आणि यापुढेही होणार नाहीत, अशी संतप्त भावना जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475