जिल्हा

अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला गती; कर्जउभारणीला मिळाली मान्यता

अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला गती; कर्जउभारणीला मिळाली मान्यता
अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला गती; कर्जउभारणीला मिळाली मान्यता फोटो: ठाणे वैभव
* राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय * नवीन पर्यायामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार ठाणे: ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीवर नामी उतारा ठरू पाहणाऱ्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक १२,२०० कोटींचा निधी उपलब्ध होण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आज बुधवारी कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून तीन किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने १२,२०० कोटींचा अंतर्गत मेट्रो प्रकल्प आखला होता. या बहुचर्चित प्रकल्पास केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला होता. या प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने तयार केला असून, ठाणे महापालिकेच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या मेट्रोची सुरूवात २०२९ पर्यंत होणार असून या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान होणार आहे. शहरातील अंतर्गत भागासाठी पालिकेने सहा डब्यांची मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती. परंतु मोठ्या शहरांमध्ये सहा डब्यांची मेट्रो तीन मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येते. यामुळे ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो दीड मिनिटांच्या अंतराने चालवावी अशी सूचना केंद्राने केली होती. परंतु ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सहा डब्यांची मेट्रो गरजेची असल्याचे मत महापालिकेने मांडले होते. अखेर केंद्र सरकारने हा मुद्दा मान्य करत सहा डब्यांच्या मेट्रोवर शिक्कामोर्तब करून प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता. राज्य मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प यासह पुणे आणि नागपूर मेट्रोच्या विविध टप्प्यांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्य सहाय्यित कर्जासाठी आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास राज्य मंत्रीमंडळाने बैठकीत मान्यता दिली आहे. तसेच प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यासही मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता अधिक वेग येणार असून, २०२९ पर्यंत मेट्रो मार्ग सुरु होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत. अंदाजे ७.६१ लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून २०२९ पर्यंत मेट्रोची सुरुवात होईल. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475