जिल्हा
आजारी महिला डोलीतून रुग्णालयात
आजारी महिला डोलीतून रुग्णालयात
फोटो: ठाणे वैभव
वरसवाडीतील रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर: शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत फुगाळे अंतर्गत येणाऱ्या वरसवाडी येथे रस्त्याअभावी आजारी महिलेला डोलीतून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वरसवाडी येथील रहिवासी मंदा आघाण या काही दिवसांपासून आजारी होत्या. गुरुवारी अचानक त्यांची प्रकृती गंभीर होऊन त्या बेशुद्ध पडल्या. यावेळी ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका थेट गावापर्यंत पोहोचू शकली नाही.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मंदा आघाण यांना डोलीत बसवून खडतर व डोंगराळ मार्गाने उचलत इगतपुरी तालुक्यातील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना इगतपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे वरसवाडी गावातील रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. रस्ता नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार रस्ता करण्याची मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वरसवाडी येथे तातडीने पक्का रस्ता करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वरसवाडी येथे आजारी महिलेला रस्त्याअभावी डोलीतून रुग्णालयात नेण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे. आजही अनेक आदिवासी व दुर्गम गावांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. शासन विविध विकास योजनांची घोषणा करत असताना प्रत्यक्षात अनेक गावांपर्यंत साधा रस्ताही पोहोचलेला नाही, ही गंभीर बाब आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन वरसवाडी गावासाठी पक्का रस्ता, आरोग्य सुविधा व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे सचिव प्रकाश खोडका यांनी केली आहे.
300x450
300x600