जिल्हा

शिवसेना शिंदे गटाची तिकीट वाटपाची डोकेदुखी वाढणार

शिवसेना शिंदे गटाची तिकीट वाटपाची डोकेदुखी वाढणार
शिवसेना शिंदे गटाची तिकीट वाटपाची डोकेदुखी वाढणार फोटो: ठाणे वैभव
उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन सुरु ठाणे : महायुतीच्या चर्चेचे गुर्‍हाळ सुरू असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. भाजपसोबत युती नकोच असा सूर आळवत काही प्रभागांमध्ये इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे केवळ भाजप दावा सांगत असलेल्या प्रभागातच नव्हे तर शिवसेनेच्या हक्काच्या प्रभागातही स्थानिक उमेदवार हवा यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे ७०० इच्छुकांना अर्ज वाटप करणार्‍या शिवसेना शिंदे गटाची तिकिट वाटपात डोकेदुखी वाढणार आहे. ठाणे महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता या महापालिकेवर आहे. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने ठाणे भाजप पदाधिकार्‍यांना बळ मिळाले आहे. या जोरावर ठाण्यात युती नको, पक्षवाढीसाठी संधी द्या अशी मागणी करत भाजपच्या १८ मंडळ अधिकार्‍यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्या आहेत. आता त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवारही हाच सूर आळवताना दिसत आहे. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर महापालिकेत संधी मिळेल या आशेने शेकडो कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले होते. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रभाग बांधून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदरमोड केली होती. विविध उपक्रम राबवले, नागरी प्रश्न सोडवले आणि आता उमेदवारी मिळवण्याची वेळ आली तर महायुती आडवी आली, अशी भावना अनेक इच्छुकांची आहे. नौपाडा, मनोरमानगर या दोन प्रभागांमध्ये सध्या अशाप्रकारे अस्वस्थता पहायला मिळत असून त्याचे वेळीच निदान केले नाही तर त्याची लागण इतर प्रभागांमध्येही होण्याची शक्यता आहे. वास्तविक नौपाडा हा एकेकाळी शिवसेनेचाच बालेकिल्ला होता. मात्र आता हे पूर्ण पॅनल भाजपच्या ताब्यात आहे. मैत्रीपूर्ण लढतीची तयारी या प्रभागात शिवसेना शिंदे गटाने केली होती. किरण नाकती, प्रकाश पायरे, भास्कर पाटील हे या प्रभागातून इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी येथे एक मेळावा घेत युती नको अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. गोकूळनगरमध्येही एकतरी जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. घोडबंदर, मानपाडा भागात भाजपचे वाढते वर्चस्व असले तरी येथील नागरी समस्या सोडवण्यात इच्छूक आघाडीवर होते. पण जागावाटपात या जागाही हातच्या जातील अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक भुषण भोईर हे मनोरमा नगरमधून गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. मात्र ते येथील स्थानिक रहिवासी नसल्याने येथे काम करणार्‍या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी शाखेतून भोईर यांना उघडपणे विरोध दर्शवण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475