जिल्हा
कावेसर तलावावरून शिंदे गट-भाजपात जुंपणार
कावेसर तलावावरून शिंदे गट-भाजपात जुंपणार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाण्यातील कावेसर तलावाच्या सुशोभीकरणावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. तलावाच्या सुशोभीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कावेसर तलावाचे काँक्रीटीकरण होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन गेल्यावर्षी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले होते. या प्रकल्पात पदपथ, ओपन जिम, स्काय वॉच टॉवर, फुलपाखरू उद्यान, व्यासपीठ आदी सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. महापालिकेचा दावा केवळ दहा टक्के भाग विकसित करण्याचा असला, तरी पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक रहिवाशांनी सुरुवातीपासूनच या कामाला विरोध दर्शविला आहे.
कावेसर तलाव हा सुमारे १५० वर्षांचा नैसर्गिक जलस्रोत असून येथे दुर्मिळ पांढरी कमळे, शेकडो वर्षांची वृक्षसंपदा, विविध पक्षी आणि जैवविविधतेची समृद्ध साखळी असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. काँक्रीटीकरणामुळे या परिसंस्थेचे अपरिवर्तनीय नुकसान होईल, असा त्यांचा इशारा आहे.
यापूर्वी या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठी चळवळ उभारली होती. हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली होती. 'सेव्ह कावेसर लेक सिटी सिटीझन मूव्हमेंट'च्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर हा विषय काही काळ शांत झाला होता.
दरम्यान, भाजपच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कावेसर परिसरातील नागरिकांनी पुन्हा हा मुद्दा आमदार संजय केळकर यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावेळी श्री. केळकर यांनी ठाण्यातील अनेक तलाव आधीच नष्ट झाल्याचे सांगत उरलेल्या नैसर्गिक तलावांचे काँक्रीटीकरण करून पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. तलावाचा नैसर्गिक स्वरूपात विकास करण्यासाठी गरज पडल्यास आमदार निधी देईन, असेही आश्वासन त्यांनी दिले. श्री. केळकर यांनी सार्वजनिकपणे काँक्रीटीकरणाला विरोध केल्याने महायुतीत या वादाने ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
300x450
300x600