जिल्हा

साकेत उडडाणपूल झाला वाहतुकीसाठी धोकादायक

साकेत उडडाणपूल झाला वाहतुकीसाठी धोकादायक
साकेत उडडाणपूल झाला वाहतुकीसाठी धोकादायक फोटो: ठाणे वैभव
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या चार किमीच्या रांगा ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम काढण्यात आले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक जात असते. उड्डाणपुलामधील एक्स्पान्शनमधील बेरिंगचा पार्ट निखळल्याने पूल अधिक हलू लागला आहे. या पुलावरील वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने या कालावधीत या मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडींचा नेहमीच फटका बसणाऱ्या ठाणे-भिवंडी बायपासवर साकेत पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी पूल हलत असून धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली. पुलाच्या पाहणीनंतर एक्सपानशन जॉईंट आहे त्यामधील बेअरिंग निखळून खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच पूल हलण्याचे प्रमाण वाढले आहे. हा पूल कॅन्टीलीव्हर पद्धतीचा असल्याने आणि जोडण्या असल्याने हा हलतो, मात्र जॉईंटमधली बेरिंग तुटल्याने जास्त हलतो आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिली. ही बाब लक्षात येताच तातडीने याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली. या कामासाठी अंदाजे सहा ते सात दिवसांचा वेळ लागणार असून त्याकरिता वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. पुलावरील नाशिककडील एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार असून निश्चितच त्याचा फटका बसून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खड्डे आणि रस्त्याचे काम यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे आधीच येथून प्रवास करणे जिकरीचे बनले असताना आता त्यात साकेत पुलाच्या कामाने त्यात अधिकची भर पडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी करत सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली नाही तर अधिकाऱ्यांनाच खाडीत फेकून देऊ असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे याच उड्डाणपुलावरून जात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. यावेळी आठवले यांनी देखील या उड्डाणपुलाची पाहणी केली. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक असल्याचे सांगत या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कोणत्या पक्षाचा विषय नसून या पुलाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. या उड्डाणपुलाच्या एक्स्पान्शनमधील बेरींगचा पार्ट निखळून खाली पडला आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे एक लेन कमी करावी लागेल, मात्र डावी-उजवीकडील वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475