जिल्हा
तीन हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच
तीन हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच
फोटो: ठाणे वैभव
* आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आग्रह
* ऐरोली-कळवा कॉरिडोर प्रकल्प अडवून ठेवण्याचा इशारा
ठाणे : नियोजित ऐरोली-कळवा कॉरिडोर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या तीन हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच करण्यात यावे अन्यथा प्रकल्पच रोखण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. या प्रकल्पात ज्या तीन हजार झोपड्या बाधित होत आहेत ते सर्व माझे मतदार असल्याचे सांगत ज्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे त्या ठिकाणी त्यांना जगणे देखील कठीण आहे. त्यामुळे या सर्व बाधितांचे प्रकल्पाच्या ठिकाणीच पुनर्वसन करावे अशी मागणी श्री. आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ऐरोली-कळवा कॉरिडोर प्रकल्प हा ऐरोली आणि कळवा यांना जोडणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांचा प्रवास अधिक जलद करणे आणि ठाणे स्थानकावरील गर्दी कमी करणे असा आहे. हा प्रकल्प मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनद्वारे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात जवळपास तीन हजार झोपडीधारक बाधित होणार असून त्यांच्या पुनर्वसनावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बाधितांच्या पुनर्वसन संदर्भात भूमिका मांडली आहे.
या रेल्वे मार्गाचे काम 2017 सालापासून सुरु होते. मात्र आम्ही ते अडवून ठेवले होते. या प्रकल्पात ज्या झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांचं पुनर्वसन अशा ठिकाणी होत आहे की तिथे माणूस जगूच शकत नाही. ठाणे महापालिकेने मला पत्र पाठवलं आहे की, आम्ही तिथल्या साडेतीन हजार लोकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करू, पालिका आयुक्तांनी तसा स्वतः मला फोन देखील केला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच म्हणणं आहे की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही, पण तिथे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे हे माझे मतदार आहेत, त्यांना दिलासा देणे, हे माझे कर्तव्य आहे. या बाधितांना प्रकल्पाच्या ठिकाणीच घरे देण्यात यावीत, असे लेखी आश्वासन मिळावे, अशी मागणी श्री.आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. तिथे वाढलेल्या काही झोपड्या या महापालिका अधिकाऱ्यांमुळे वाढल्या आहेत, पुनर्वसनामध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत, हा खूप मोठा घोटाळा असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.
ऐरोली आणि कळवा यांना थेट जोडल्यामुळे मुंब्रा, दिवा, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना जलद रेल्वे सेवा मिळेल. ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प अतिरिक्त मार्गिका म्हणून काम करेल, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक कार्यक्षम होईल.
300x450
300x600