जिल्हा
आंदोलन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास बसची धडक
आंदोलन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास बसची धडक
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी आलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याला बसने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या अपघातात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान हे मंगळवारी महापालिकेत आले होते. त्यावेळी मीरा-भाईंदरमधील विविध संघटनांशी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयात गर्दी केली होती. प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. परिस्थिती चिघळू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच रोखले होते.
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच काशीमिरा परिसरात कार्यरत असलेल्या आशा नावाच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या पायावरून मुख्य प्रवेशद्वाराबाहेरून जाणारी बस गेली. बसच्या चाकात पाय अडकल्याने महिला काही अंतर फरफटत गेल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर तत्काळ महिलेला जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी मीरा रोड येथील एका मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. भाईंदर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
300x450
300x600