जिल्हा
उल्हासनगरमध्ये डान्स बारवर पोलिसांचा छापा
उल्हासनगरमध्ये डान्स बारवर पोलिसांचा छापा
फोटो: ठाणे वैभव
१० बारबालांसह १२ जण अटकेत
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील श्रीराम चौक परिसरात रात्रभर सुरू असलेल्या एंजल डान्स बारवर विठ्ठलवाडी पोलीस ठाणेच्या पथकाने छापा टाकून १० बारबालांसह एकूण १२ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बारचा मॅनेजर आणि दोन वेटरचा समावेश आहे. संबंधित बार वादग्रस्त असून गुन्हेगारांच्या वावरामुळे तो परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प ४ मधील श्रीराम चौक परिसरात चार ते पाच डान्स बार सुरू असून ते रात्रभर सुरू राहत असल्याची तक्रार पोलिसांकडे येत होती. या बारमध्ये बाहेरील गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचीही माहिती समोर आली होती.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना एंजल डान्स बार रात्रभर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह छापा टाकला. छाप्यादरम्यान बारमध्ये महिलांना तोकडे कपडे परिधान करून अश्लील गाण्यांवर नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी बार मॅनेजर रफिककुल्ला हरेश शेख तसेच वेटर मिनल निवासी आणि दिनेश गावडा यांनी संगनमत करून नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सर्वांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैधरीत्या सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475