संपादकीय

पायी (हळू-हळू) चाला... उत्तर देऊ इंधन-टंचाईला!

पायी (हळू-हळू) चाला... उत्तर देऊ इंधन-टंचाईला!
पायी (हळू-हळू) चाला... उत्तर देऊ इंधन-टंचाईला! फोटो: ठाणे वैभव
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीकडे संकट म्हणून न पाहता त्याकडे संधी म्हणून पाहिले गेले तर होणारे दु:ख वा मन:स्तापाची तीव्रता कमी होऊ शकते. संकटाकडे संधी म्हणून पाहिले तर आव्हानाची झळ कमी होऊ शकेलही! या अनुमानाचे शास्त्रोक्त समर्थन करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ नक्कीच नाही, परंतु अलिकडच्या जीवनशैलीने माणसाला पुरते बिघडवले असताना ती विस्कटलेली घडी नीट करण्याची संधी इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाने दिली आहे, हे कोणी लक्षात घेतलेले दिसत नाही.
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून दोन बातम्यांनी सर्वाधिक जागा व्यापली आहे. भोंदूबाबा अशी नवी ओळख झालेला अशोक खरात आणि त्याचे उपद्व्याप ही त्यापैकी एक बातमी. तर दुसरी अर्थातच आखातात पेटलेल्या युद्धाची. खरातने युद्धालाही मागे टाकले यावरून भारतीयांना गॅस-टंचाई, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा यांची फार फिकीर नाही असेच वाटते. आपला समाज असा आंबट शौकिन होणे अपेक्षित नव्हते. पण नसे कोणी मान्य करणार नाही आणि त्याचे खापर माध्यमांवर फोडून दांभिकपणा सिद्ध करतील. भोंदूबाबाच्या बातम्यांनी इतका हैदोस घातला आहे की या प्रकरणातील जे विकृत चाळे आपल्या संस्कारक्षम पिढीपर्यंत पोहोचू नये याची काळजीही घेतली गेली आहे. भोंदूबाबावर कायदेशीर कारवाई जी व्हायची ती होईल, परंतु तोवर त्याला घरा-घरात पोहोचवण्याचे कर्तव्य (!) माध्यमांनी इतके सचोटीने करावे याचे आश्चर्य वाटते.
पेट्रोलचे रेशन सुरु झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. काही हुशार (!) मंडळींनी त्यावरही उपाय शोधला, ते चक्क इंधनाची साठेबाजी करु लागले. युद्धामुळे जगाचे काही झाले तरी भारतीयांच्या या सवयी, ज्याला ते जुगाड असेही म्हणतात, सुटता-सुटत नाहीत. आम्ही ‌’ब्लॅक‌’ने पेट्रोल घेऊ नाही तर साठवून ठेऊ, पण कोणत्याही परिस्थितीत आमची जीवनशैली बदलणार नाही या निर्धारापासून तसूभरही हटणार नाही, ही मानसिकता बदलण्याची संधी होती.
कोरांना काळात अगदी जीवावर बेतेल म्हणून नागरिकांनी जाचक अशा सर्व नियामांचे मारुन मुटकून का होईना पालन केले होते. युद्ध तिथे दूर आहे, टीव्हीवर पाहून काहींना व्हिडिओ गेममधील लुटुपटूचे युद्ध पहात असल्यासारखे वाटत असेल. त्यामुळे युद्धामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना जो-तो आपल्या परीने परतवून लावत आहे. आमचे याबाबतीत एकच म्हणणे आहे की स्वयंपाकासाठी पर्यायी स्त्रोतांचा वापर होऊ शकेल, परंतु पेट्रोल-डिझेल गायब झाले तर बाका प्रसंग उद्भवू शकतो. यासाठी वाहने बाजूला सारुन थोडे चालण्याचा मार्ग स्वीकारणे शहाणपणाचे ठरू शकेल. युद्धजन्य देशापेक्षा आपण नशिबवान आहोत हा दिलासा देणारा विचार मनात ठेऊन दोन पावले चालण्याचा निश्चय केला तर? असे आवाहन कोणी करील याची वाट पहाण्यापेक्षा आपणहून पुढाकार घ्यायला काय हरकत आहे. देशाला सैनिक लागतात तशी जबाबदार नागरिकांचीही गरज आहेच की !

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475