संपादकीय

ठाकरी करिष्मा : नवा अध्याय

ठाकरी करिष्मा : नवा अध्याय
ठाकरी करिष्मा : नवा अध्याय फोटो: ठाणे वैभव
दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा क्षण सैनिकांसाठी थरार होता, ही बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली खानदानी युती टिकली तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे परिणाम नक्कीच होतील. हा थरार काही जणांचा थरकापही उडवू शकतो! अर्थात राजकारण आहे ते, इथे उजाडणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवीनच घेऊन येत असतो आणि रात्रीच्या अंधारातही सावल्यांचे खेळ सुरु असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आता बघता-बघता दोन दशकांचा काळ लोटेल. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. हिन्दुत्वाची गंगा गल्ली-बोळातून वाट काढत पुढे चालली आहे. प्रादेशिक अस्मितेला राष्ट्रीय विकासाचे स्वप्न खुणावत आहे आणि या सर्व वेगवान उलथापालथीत मतदारांची मानसिकता बदलत चालली आहे. तो काहीसा गोंधळलेला आहे की त्याच्या या अवस्थेचा राजकीय लाभ आपली ‌’पॉलिटिकल सिस्टिम‌’ घेत आहे? अशा असंख्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि पुतण्या एका व्यासपीठावर येत असेल तर दोनच गोष्टी होऊ शकतात.: एक-गोंधळाचे मळभ दाटू शकते किंवा दोन-या ढगातून आशेची किरणे दिसू लागतात. मुंबईत झालेल्या या ऐतिहासिक ‌’विजय मेळाव्याती‌’ल गर्दी आणि राज्यातील कानाकोपऱ्यात आपल्या घरात बसून या सभेस उपस्थिती लावणाऱ्या जनतेच्या मनात आशा पल्लवित झाली असेल तर ठाकरे यांचा ब्रॅण्ड अजून शाबूत आहे, असे म्हणता येऊ शकेल. राज्याचे त्रिभाषा सूत्र, जे अखेर गुंडाळण्यात आले असे बूमरँग होईल याची कल्पना सत्ताधिशांना तरी होती का? इतकी त्रेधातिरपीट उडणार याचा अंदाज सत्तेतील 'चाणक्यांना' येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. त्यावरून राजकारण किती उथळ आणि स्वमग्न असते याची प्रचिती येते. अन्यथा लोकभावनांचा अंदाज येताच त्यांनी आग भडकण्यापूर्वीच विझवली असते. हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम राहिले असते तर काय सांगावे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा दुसरा अध्याय लिहिला गेला असता, तो लिहिला गेला नाही हे सरकारच्या पथ्यावर पडले असेलही, पण ठाकरे बंधू एकत्र येण्याचे नवे संकट त्यांनी निर्माण केले. आता हे निखारे घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरे जावे लागणार. शिवसेना, त्यात मनसे आलीच, या संघटना भावनेच्या ऊर्जेवर चालत असतात. ही ऊर्जा हिंदीच्या मुद्याने दिली. मराठी अस्मितेला आपले दोन लाडके भाऊ एकत्र बघायला मिळाले. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थिती आज नाही. तो काळ वेगळा होता. नेते उत्तुंग होते, नि:स्वार्थी होते, राजकारण आजच्या इतके गढुळही नव्हते आणि महाराष्ट्राच्या व्यापक हिताखेरीज नेत्यांना काही दिसतही नव्हते. त्यामुळे 108 हुतात्म्यांना या चळवळीसाठी आपले प्राण समर्पित करावेसे वाटले. आज अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. राजकारण खूप ‌’प्रॅक्टिकल‌’ झाले आहे. तडजोडी-वाटाघाटी-चर्चा-बैठका- अशा चारसूत्री कार्यक्रमांत ते बांधले गेले आहे. त्यामुळे मराठी माणसाचे अस्तित्व आणि हुंकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून त्याला सापडले असले तरी हिंदी भाषेतून ते मिळाले असतेच असेही नाही. महाराष्ट्रातील हिंदी-विरोध दक्षिणेकडील राज्यांइतका कडवट नाही. त्यात पुन्हा मराठी माणूस सहिष्णू. हे सर्व लक्षात घेता हिंदीचा मुद्दा अचूक हेरून तितकेच अचूक टाईमिंग साधले गेले. एक दुभंगलेले घराणे त्यानिमित्त एकत्र आले. आणि आता हे मनोमिलन दोन्हीकडील सैनिकांच्या परिपक्वतेवर अवलंबून रहाणार आहे. काय सांगावे काही सैनिकांना व्यक्तीगत राजकीय महत्वाकांक्षा बाजूला साराव्या लागतील. त्यांना या मन:स्थितीत आणणे आणि हा प्रगल्भ विचार रुजवणे असे दुहेरी आव्हान ठाकरे बंधूंना स्वीकारावे लागणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना शिवसेनेचा एक मोठा गट या प्रक्रियेपासून दूर आहे. त्यामुळे मराठी मतांचे त्रिभाजन टळले असले तरी विभाजनाची शक्यता रहातेच. श्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांमधील (अगदी भाजपातीलही) मराठी माणसांना मराठीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्याचा कसा आणि किती परिणाम होतो ते पहावे लागेल. अन्य पक्षांमध्ये विखुरलेली मराठी मते, हिन्दुत्वाला अस्मितेपेक्षा प्राधान्य देणारी मते आदींचा विचार ठाकरे बंधूंचे यश ठरवणार आहे. आगामी महापालिका निवडणुका रंजक होणार यात वाद नाही. परंतु राजकारण हे मनोरंजनाचे साधन होणे निदान पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. वेळ तसा कमी आहे. त्यामुळे ठाकरे बंधू कोणती व्यूहरचना आखणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475