जिल्हा

मधाचे गाव म्हणून पिंपळोलीला मिळणार ओळख

मधाचे गाव म्हणून पिंपळोलीला मिळणार ओळख
मधाचे गाव म्हणून पिंपळोलीला मिळणार ओळख फोटो: ठाणे वैभव
बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीवाडी पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत केले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. पिंपळोली गावात मधाचे गाव असे फलक लावण्यास सुरूवात झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील आदिवासींना रोजगार आणि पर्यटनाच्या दृष्टीने बदलापूर आणि परिसराचा विकास होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. बदलापूरच्या जांभळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट आणि आमदार कथोरे करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने पिंपळोलीवाडी पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी गावात तसा फलक लावण्यात आला. महामंडळाच्या वतीने मधमाशापालन आणि मधोत्पादनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण, प्रोत्साहन तसेच येथे तयार होणाऱ्या मधाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंबरनाथ तालुक्यात बारवी धरणालगत असणाऱ्या या परिसरात अनेक जांभळांची झाडे आहेत. या गावात बहुतेक आदिवासी ठाकुर कुटुंबे राहतात. याच परिसरात आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण बदलापूर जांभूळ नुकतेच भौगोलिक मानांकनाच्या यादीत सुचीबद्ध झाले आहे. त्यामुळे या परिसरात प्रामुख्याने जांभूळ मधाचे उत्पादन घेतले जाणार असले तरी अन्य स्वादाच्या मध निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली. अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली आणि पालघर तालुक्यातील घोलवड या गावांना मधाचे गाव दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर परिसर आणि मुरबाड तालुक्यातील पेंढरी गाव मधाचे गाव घोषीत करण्याबाबत आमदार कथोरे खादी ग्रामोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करीत आहेत. महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी यासंदर्भात बदलापूर परिसराला भेट देऊन आमदार कथोरे यांच्याशी चर्चा करत स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. बदलापूरचे जांभूळ मुंबई आणि परिसरात प्रसिद्ध आहे. जांभुळाला गतवैभव आता प्राप्त होत आहे. त्यात मधमाशा पालन हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योग ठरेल. त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळेल. तसेच पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475