जिल्हा
केवळ १५ ते २० टक्के झाडांचे पुनर्रोपण होते यशस्वी
केवळ १५ ते २० टक्के झाडांचे पुनर्रोपण होते यशस्वी
फोटो: ठाणे वैभव
डॉ. नीलिमा कुलकर्णी यांची माहिती
ठाणे: केवळ १५ ते २० टक्के झाडांचे पुनर्रोपण यशस्वी होते. झाडांचे पुनर्रोपण केवळ समाधानासाठी असते, अशी माहिती पर्यावरणतज्ञ डॉ. नीलिमा कुलकर्णी यांनी रविवारी येथे दिली.
रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणी दिवसाचे औचित्य साधून पर्यावरण परिसंवादाचे आयोजन केले होते. नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक १९ मधील रोटरी सेंटरमध्ये हा परिसंवाद झाला. या परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.संजय जोशी, डॉ. नीलिमा कुलकर्णी, ठाणे महापालिकेचे अधिकारी ओम परळकर सहभागी झाले होते. 'ठाणेवैभव'चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी परिसंवादाचे सूत्र सांभाळत सहभागी वक्त्यांना बोलते केले.
त्यावेळी बोलताना डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, वृक्षारोपण करताना नुसती झाडे लावण्यापेक्षा परिसंस्था जतन केली पाहिजे. त्यावेळी स्थानिक झाडे लावल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होतो. यावेळी त्यांनी हरियाली संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. तर प्लॅस्टिकशिवाय आपण जगू शकत नाही. प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होत नाही तर त्याच्या वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे प्रदूषण होते असे मार्गदर्शन ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.संजय जोशी यांनी केले. जगात भारताचा प्लॅस्टिक प्रदूषणात १२७वा क्रमांक आहे. त्यामुळे याबाबत अधिक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेचे अधिकारी ओम परळकर यांनी सांख्यिकीक माहिती देत हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475