जिल्हा

पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाने नवी मुंबईची जगाशी जोडणी

पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाने नवी मुंबईची जगाशी जोडणी
पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाने नवी मुंबईची जगाशी जोडणी फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी पहिल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सुरुवात झाली. अबूधाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स-२०८ हे विमान सकाळी १०.२० वाजता विमानतळावर उतरले. या विमानाचे पारंपरिक वॉटर कॅनन (पाण्याच्या तोफांनी) सलामी देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवांचा औपचारिक प्रारंभ झाला असून, शहराची जगाशी थेट हवाई जोडणी प्रस्थापित झाली आहे. अबूधाबी-नवी मुंबई या मार्गावर प्रारंभी आठवड्यातून तीन उड्डाणे होणार आहेत. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीलाही या सेवेमुळे चालना मिळणार असून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशातील उद्योग, व्यापार तसेच निर्यात क्षेत्राला त्याचा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर अवघ्या २०० दिवसांत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुरुवात झाली आहे. या कालावधीत सुमारे २३ लाख प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केल्याची नोंद आहे. सध्या देशांतर्गत सुमारे १५० विमानांची ये-जा या विमानतळावरून होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यामुळे पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील उद्योग, लॉजिस्टिक्स, पर्यटन, हॉटेल व्यवसाय तसेच बांधकाम क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे. विमानतळाच्या परिसरात विकसित होत असलेल्या व्यावसायिक प्रकल्पांना आणि गुंतवणुकीलाही यामुळे चालना मिळू शकते, असे संबंधित क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारताचे जगाशी हवाई, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करणारे नवे प्रवेशद्वार म्हणून विकसित होत आहे. भविष्यात विविध आंतरराष्ट्रीय शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यामुळे या विमानतळाचे देशाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील महत्त्व आणखी वाढणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475