महाराष्ट्र
नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
फोटो: ठाणे वैभव
सिंधुदुर्ग: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे. राणे उद्या शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून मागील काही दिवस चर्चा सुरु होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सभांचा धडाका लावला होता.
नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचं काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंतांनी दिली आहे. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील,असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी जवळपास नारायण राणेंचे नाव निश्चित होते. अखेर आज घोषणा झाली. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या जागेसाठी इच्छुक होते. रत्नागिरीत सध्या उदय सामंत आणि सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ताकद आहे. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत सामंत बंधूंनी सामंजस्याची भूमिका दाखवली आहे. नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत तर सावंतवाडीचे दिपक केसरकर आमदार आहेत. जे सध्या महायुतीमध्ये आहेत.
किरण सामंत यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंसाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा आहे. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475