जिल्हा
प्लास्टिक स्क्रॅपच्या आड मद्यतस्करी
प्लास्टिक स्क्रॅपच्या आड मद्यतस्करी
फोटो: ठाणे वैभव
३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे: शिळफाटा परिसरात संशयित कंटेनरची तपासणी केली असता, कंटेनरमधून गोवा राज्यातील निर्मित देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्लास्टिक स्क्रॅप वाहतूक असल्याचे भासवून गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य आणण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक, ठाणे-१ निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या पथकाने केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिळफाटा सर्कल परिसरात विशेष नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी गुजरात नोंदणी क्रमांक असलेला एक आयशर कंटेनर संशयास्पदरीत्या आढळून आला. वाहनाची झडती घेतली असता प्लास्टिक स्क्रॅपऐवजी पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये मद्याचा साठा लपविल्याचे उघड झाले. या बॉक्सची तपासणी केली असता, गोवा राज्यात निर्मित 'जी.एम. संत्रा' आणि 'टँगो पंच' या ब्रँडचे महाराष्ट्रात विक्रीसाठी तयार करण्यात आलेले देशी मद्य तसेच गोव्यात विक्रीसाठी असलेल्या 'रॉयल स्टॅग' या ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. कारवाईदरम्यान देशी मद्याचे ३९३ बॉक्स आणि विदेशी मद्याचे १० बॉक्स, असा एकूण ४०३ बॉक्सचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मद्यसाठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर असा मिळून सुमारे ३५ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नूरमोहजम मोहम्मदअनवार सिध्दीकी याला अटक करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
300x450
300x600