जिल्हा
झाड तोडताना ओंडका अंगावर पडून मजुराचा मृत्यू
झाड तोडताना ओंडका अंगावर पडून मजुराचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
बाळकुम येथील घटना
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची साडेसाती संपण्याचे काही नाव घेत नाही. झाड पडून एका ठाणेकराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज बाळकूम भागातील एक चिंचेचे झाड तोडत असताना झाडाचा ओंडका पडून एका मजुराचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बालाजी डोंगरे (३५) असे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या खाजगी मजुराचे नाव आहे. काल रात्री बाळकूम भागातील गौतम नगर येथील घरावर चिंचेचे झाड कलंडल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत खाजगी ठेकेदाराला झाड तोडण्याचे काम दिले होते. ठेकेदाराकडे असलेला बालाजी डोंगरे हा कर्मचारी हे झाड तोडण्याचे काम करत होता. झाड घरावर आणि एका संरक्षक भिंतीदरम्यान पडलेले होते. हा भाग अतिशय चिंचोळा असल्याने त्या भागात झाड तोडणारे वाहन जाऊ शकत नव्हते, त्यामुळे हाताने झाड तोडण्याचे काम बालाजी डोंगरे हे करत होते. त्यांनी झाडाचा वरचा भाग तोंडलाही होता, परंतु झाडाचे खोड तोडत असताना तुटलेला ओंडका अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बालाजी डोंगरे हे मूळचे लातूर येथील असून सध्या पत्नी आणि दोन मुलांसह वाघबीळ भागात राहत होते.
१५ दिवसांपूर्वी आरटीओ येथे झाड पडून एका ठाणेकराचा मृत्यू झाला होता. त्यावरून वृक्ष प्राधिकरण विभागाच्या विरोधात सर्वसाधारण सभेत टिकेची झोड उठविण्यात आली होती. शहरात झाडे पडण्याचे प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणावर आहे. आता तर कर्मचारी मृत्यूमुखी पडल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475