जिल्हा
'बिनविरोध पॅटर्न'मध्ये सरकारी यंत्रणांचा सहभाग
'बिनविरोध पॅटर्न'मध्ये सरकारी यंत्रणांचा सहभाग
फोटो: ठाणे वैभव
ठाकरे गट आणि मनसेचा पत्रकार परिषदेत आरोप
ठाणे: शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यात सत्ताधाऱ्यांसह सरकारी यंत्रणांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
अर्ज माघारी दिवशी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर नेत असल्याचे चित्रिकरणच यावेळी अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केले. प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंगल्यावर बोलावून आमिष दाखवणे तसेच, धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने केली आहे.
राजन विचारे यांनी या निवडणुकीत राज्यभरात ३३६ अर्ज अधिकाऱ्यांनी बाद केले असल्याचे सांगून तब्बल ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट केले. बंगल्यावर बोलावुन आमिष देत उमेदवारांना बिनविरोध निवडण्याचे अर्धेअधिक काम निवडणुक अधिकाऱ्यांनीच केले. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे यांच्या मोबाईलची तपासणी व्हायला हवी, अशी मागणी विचारे यांनी केली. मनी आणि मसलचा वापर करून निवडणूक बिनविरोध करणे हा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला असून सत्ताधाऱ्यांनी हा नवा फंडा सुरू केला आहे. तेव्हा, हे बिनविरोध उमेदवार बाद करण्याची आग्रही मागणी विचारे यांनी केली.
पालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी मागे घेणाऱ्या गद्दारांना क्षमा नाही. पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता माघार घेणारे सध्या गायब आहेत. निवडणुका संपताच ज्यांनी गद्दारी केली, त्यांचा पाहुणचार आम्ही घेणारच, असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475