जिल्हा

शहापुरात हजारो आदिवासी भगिनींची पाण्यासाठी वणवण

शहापुरात हजारो आदिवासी भगिनींची पाण्यासाठी वणवण
शहापुरात हजारो आदिवासी भगिनींची पाण्यासाठी वणवण फोटो: ठाणे वैभव
महिला दिनी पंचायत समिती कार्यालयावर होणार तीव्र आक्रोश शहापूर: शहापूर तालुक्यातील विहिगाव ग्रामपंचायत हद्दीसह तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हजारो आदिवासी कुटुंबांना दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असून जागतिक महिला दिनी म्हणजेच येत्या ८ मार्च रोजी शहापूर पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा महिलांनी दिला आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातील विहिरी, बोअरवेल व नळपाणी योजना पूर्णतः कोरड्या पडल्या असून, काही ठिकाणी आठवड्यातून एकदाही पाणीपुरवठा होत नाही. अनेक पाड्यांमध्ये महिलांना डोक्यावर हंडे घेऊन डोंगर-दऱ्यांतून एक ते दोन किलोमीटर पायी चालत पाणी आणावे लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि अपुऱ्या पाण्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.“महिला दिन साजरा नको, आधी पाणी द्या” असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान विहिगाव ग्रामपंचायतसह संपूर्ण शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये तत्काळ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा, कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वित करणे, नवीन बोअरवेल मंजूर करणे व रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. महिला, वृद्ध, लहान मुले यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर असून आदिवासी बांधवांचा हा संताप आता उफाळून आला असून, महिला दिनी होणारे हे आंदोलन प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. अप्पर वैतरणा धरण त्यांच्या गावाच्या कुशीत आहे. त्यातील पाणी मुंबईला जीवन देते. पण त्या धरणाच्या कडेला वास्तव्य करणाऱ्या महिलांना मात्र थेंबभर पाणी मिळत नाही. डोळ्यांसमोर पाणी साठलेले दिसते, पण ते पिण्यासाठी मिळत नाही ही अवस्था केवळ अन्यायकारक नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे त्यांचे मत आहे. जलजीवन योजनेचे काम सुरू होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही आजपर्यंत एकाही आदिवासी पाड्याला पाणी मिळालेले नाही. भावली धरणातून पाणी येईल का, कधी येईल, या प्रश्नाचे उत्तर ना प्रशासनाला माहिती ना लोकप्रतिनिधींना. महिलांच्या डोक्यावर रोज १ ते २ किलोमीटर दूरून हंडे उचलण्याचे ओझे मात्र नक्की टाकले गेले आहे.हे ओझे पाण्याचे नाही, तर प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे असल्याचे श्रमजीवीचे पदाधिकारी सांगतात. गावठा, तेलमवाडी, ढूबाचीवाडी, कातवारवाडी, हिवाळवाडी, कोळ्याचीवाडी, शिदवाडी, भेंडीचीवाडी, भगतवाडी, बौद्धवाडा, खडकवाडी, आघाणवाडी, खरंब्याचीवाडी, चिंचवाडी, पाणोटा, निरगुडवाडी, कवट्याचीवाडी, दऱ्याचीवाडी अशा साडेतीन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पाड्यांमध्ये महिलांचे आयुष्य पाण्यासाठीच्या संघर्षातच संपत आहे. पाणी मिळवताना त्यांचे आरोग्य व सन्मान हरवत असल्याची भावना मालू हुमणे, पप्पु वाघ, प्रकाश खोडका, लक्ष्मी वाघ, गणेश ठाकरे, रामा आघण, सविता सोंगाल, सावित्री उघडे आदी महिला व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475