जिल्हा
भिवंडीत तिसरा डोळा टिपणार बेशिस्त वाहन चालकांना
भिवंडीत तिसरा डोळा टिपणार बेशिस्त वाहन चालकांना
फोटो: ठाणे वैभव
होणार थेट दंड आकारणी
भिवंडी : भिवंडीत बेशिस्त वाहन चालकांवर अंकुश आणण्यासाठी आता वाहतुकीच्या मुख्य मार्गावर व्हिडीओ कॅमेरे लावले जाणार आहेत. या माहितीनंतर शहरातील बेशिस्त वाहन चालकांमध्ये खळबळ माजली आहे.
शहरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर नेहमी रिक्षा रेंगाळत असल्याने त्यांच्या समुहाने ठिकठिकाणी रस्ता अडविलेला दिसून येतो. अनेकदा रिक्षाचालक आणि दुचाकी चालक वाहतुकीचे नियम तोडून वाहने हाकताना दिसतात. त्यामुळे अनेकदा ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. बऱ्याचदा चोरीची दुचाकी आणि तीन चाकी वहाने रस्त्यावर फिरत असतात. त्यांची तपासणी होत नसल्याने बोगस रिक्षा राजरोसपणे व्यवसाय करतात. चोरीच्या दुचाकी पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून जलद गतीने पळवितात. त्याचप्रमाणे शहरातील अनेक चारचाकी वाहनांनी अवैधरित्या काळ्याकुट्ट काचा लावल्या आहेत. तर काहींनी अशा काचा लावून पुढे पदाधिकारी असल्याच्या पाट्या लावल्याने पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. अशी वाहने आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत.
अनधिकृत पार्किंग आणि नो एन्ट्रीमध्ये घुसणारे वाहन चालक देखील कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहेत. शहराबाहेरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांवर देखील या माध्यमातून कारवाई होणार आहे. या कारवाईमुळे शहरातील आणि शहराबाहेरील वाहनचालकांना शिस्त लागणार असून वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासूनही वाहनचालकांची आणि नागरिकांची सुटका होणार आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी भिवंडीत कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात विविध शहरात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. भिवंडीत कॅमेरे लावण्यासाठी शहरातील विविध मार्गांचा आणि चौकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही महत्वाच्या ठिकाणी मनपाची परवानगी देखील घेण्यात येणार आहे, अशी माहिती भिवंडी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शरद ओहोळ यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475