जिल्हा

बदलापूर नगरपालिकेत सेना-राष्ट्रवादीत हमरी-तुमरी

बदलापूर नगरपालिकेत सेना-राष्ट्रवादीत हमरी-तुमरी
बदलापूर नगरपालिकेत सेना-राष्ट्रवादीत हमरी-तुमरी फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : बदलापूर नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांत आज जोरदार हमरीतुमरी झाली मुद्द्यावरून गुद्द्यापर्यंत वातावरण जाण्याची शक्यता निर्माण झाली. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला पण वातावरणात तणाव निर्माण झाल्याने पोलिस यंत्रणेला पाचारण करावे लागले. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. यामुळे आमदार म्हात्रे यांचे बंधू , शिवसेना नगरसेवक माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे तसेच शिवसेना नगरसेवक तुकाराम म्हात्रे चांगलेच संतापले. यावरून सभागृहात म्हात्रे आणि पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सभागृहात वातावरण तापले असल्याने नगराध्यक्षा घोरपडे यांनी सभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले. अर्ध्या तासाच्या अंतराने सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. सभागृहात सर्व सदस्यांनी विषयपत्रिकेवरील कामकाजावरून चर्चा करावी, वैयक्तिक आरोप प्रत्यारोप, हेवेदावे टाळावेत, असे आवाहन नगराध्यक्षा घोरपडे यांनी केले. नगरपालिकेत नव्याने आलेल्या सदस्यांसाठी पालिका नियम आणि कामकाज याबाबत माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेण्याचे आवाहन शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी नगराध्यक्षा घोरपडे आणि मुख्याधिकारी यांना केले. यानंतर सभेचे कामकाज सुरळीत पार पडले. विकास कामांचे विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सभेचे कामकाज संपताच पालिका आवारात सभागृहातील वातावरणांचे पुन्हा पडसाद उमटले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. प्रभाकर पाटील यांच्या विधानाचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना शांततेचे आवाहन केले. यामुळे पालिका आवारात वादावादीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475