जिल्हा

ठाण्यातील हॉटेल व्यवसाय 'गॅसवर'

ठाण्यातील हॉटेल व्यवसाय 'गॅसवर'
ठाण्यातील हॉटेल व्यवसाय 'गॅसवर' फोटो: ठाणे वैभव
ठाणे: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाची झळ देशाला बसत असून ठाणे जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस विक्री चार दिवसांपासून बंद झाली आहे. त्यामुळे आणखी चार ते पाच दिवस ठाण्यातील हॉटेल सुरळीत सुरु राहणार आहेत. जिल्ह्यात सध्याच्या घडीला घरगुती गॅस सिलेंडर पुरेशा प्रमाणात असला तरी, त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यामुळे गृहिणींनी गॅस जपून वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मध्य पूर्वेतील इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तणावामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. याचा फटका भारताला बसला असून देशातील अनेक राज्यांमध्ये गॅस पुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस मिळविण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल्समध्ये वापरण्यात येणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा मागील चार दिवसांपासून पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांची चिंता वाढू लागली आहे. ठाणे ४१ फ परिमंडळ येथे सहा गॅस एजन्सी असून फ परिमंडळात ७२ गॅस एजन्सी आहेत. शिधावाटप कार्यालयाकडून या एजन्सीना घरगुती गॅस सिलेंडर वाटपासाठी प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. यामध्ये ज्या ग्राहकांकडे एक सिलेंडर आहे, त्यांना प्रथम गॅस उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत तर, ज्या ग्राहकाकडे दोन गॅस सिलेंडर आहेत, त्यांच्यासाठी २५ दिवसांची कालमर्यादा आखून देण्यात आली असल्याची महिती शिधावाटप कार्यालयाकडून देण्यात आली आहे तसेच ठाणे जिल्ह्यात कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून ग्राहकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन देखील केले आहे. ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे. केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडर वाटप बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांना प्राधान्यक्रमानुसार सिलेंडर देण्याच्या सूचना शासनाच्या निर्देशानुसार एजन्सीना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध भागात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा पुरवठा दोन ठिकाणाहून होत असतो. वापरलेले गॅस सिलेंडर रिफिलिंग स्टेशन हे उरण येथील बेंडखळ आणि चेंबूर येथील माहूल येथे असून तेथून गॅस पुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याच्या घडीला ठाण्यात अजून तरी हॉटेल्स व्यवसायावर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. मात्र, परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी ४ ते ५ दिवसांत शहरातील हॉटेल्स व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600