जिल्हा

महामार्गाची 'समृद्धी' झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच!

महामार्गाची 'समृद्धी' झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच!
महामार्गाची 'समृद्धी' झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच! फोटो: ठाणे वैभव
* अधिकाऱ्याला दाखवणार घरचा रस्ता * जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी ठाणे: ठाणे ते भिवंडी वडपे या रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अपघातात नागरिकांचे प्राणही जात असल्याने संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली तसेच एका अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहे. मागिल अनेक वर्षे वडपे ते माजिवडे या आठ पदरी महामार्गाचे काम सुरु असून त्याचे अजूनही २० ते २५टक्के काम बाकी आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीचा त्रास ही नित्याची बाब झाली आहे. त्यात या रस्त्यावर अपघात होऊन चालकांचा मृत्यू देखील झाला आहे. याबाबत पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री, खासदार, आमदार यांनी भिवंडी-वडपे रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत, संताप व्यक्त केला. ठाणे ते भिवंडी वडपे येथील रस्ता अजून का झाला नाही? तो काय मुंबई-गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का? काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश दिले. तसेच काम करत नसाल तर तुम्हाला देखील निलंबित करीन असा इशारा देत, श्री.शिंदे यांनी तत्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. पनवेल ते कल्याण, ठाणे, भिवंडी व पालघर या मार्गांवरील तीव्र वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरत “काम करा, नाहीतर निलंबनाची कारवाई करेन” असा इशारा दिला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचे काम जुन्या तंत्रज्ञानाने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर खासदार नरेश म्हस्के यांनी या रस्त्याबाबत अधिकाऱ्यांची ढिलाई बैठकीत अधोरेखित केली. दरम्यान, ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनीही एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी व एमएमआरडीए विभागांवर खापर फोडले. समृद्धी महामार्ग झाला, पण ठाणे-भिवंडी वडपे रस्ता झालेला नाही. सहा लेनवरून दोन लेनवर बॉटलनेक होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475