महाराष्ट्र
दप्तर घेऊन आजीबाई जातात शाळेला; गिरवतात 'गमभन'
दप्तर घेऊन आजीबाई जातात शाळेला; गिरवतात 'गमभन'
फोटो: ठाणे वैभव
१६हून अधिक आजीबाई होणार साक्षर
ठाणे : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते आणि महत्त्वाकांक्षा असेल, आवड असेल तर ७०-८० नंतरही शिक्षण घेता येते, साक्षर होता येते, याचे दर्शन ठाण्यातील शांतीनगर येथील शाळेत होते.
आजीबाईंसाठी ठाण्यातील शांतीनगर परिसरात शाळा भरते. 60 ते 80 वयाच्या १७ आजीबाई येथे येऊन शिक्षण घेतात. माधुरी पाटील यांच्या जयश्री फाउंडेशनच्या वतीने ही आजीबाईंची शाळा भरत असून दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या आजी कुतूहलाचा विषय ठरत आहेत.
आपल्या आसपास अशा अनेक वयोवृद्ध महिला अथवा आजीबाई असतात ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असून देखील काही कारणास्तव शिक्षण घेणं शक्य झालं नाही. अशा आजींसाठी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या शांतीनगरमधील आजीबाईंची शाळा एक वरदान ठरत आहे. आतापर्यंत केवळ लहान मुलांचा ऐकू येणारा किलबिलाट आता आजीबाईंच्या किलबिलाटात रुपांतरीत झाला आहे. तब्बल 60 ते 80 वर्षांच्या 17 आजीबाई दर मंगळवारी आणि शनिवारी या शाळेत आवर्जून हजेरी लावतात.
दुपारी चार ते साडेपाचपर्यंत या सर्व आजीबाई पाढे पाठ करणे, मुळाक्षरे गिरवणे यात दंग झालेल्या दिसतात. पहिला एक तास अभ्यास आणि नंतरचा अर्धा तास गाणी आणि ओव्या यांच्यामध्ये वेळ कधी निघून जातो ते कोणालाच कळत नाही.
जयश्री फाउंडेशनच्या माधवी पाटील या त्यांच्या शिक्षिका असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आजीबाई अत्यंत मन लावून गेले चार महिने शिक्षण घेत आहेत. "बाई आम्ही आपले विद्यार्थीच आहोत, त्यामुळं आम्हाला चुकलं तर ओरडा, रागवा" असं सांगायला देखील या सर्व आजीबाई विसरत नाहीत.
जयश्री फाउंडेशन आणि के व्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे हरेश गोगरी यांच्या माध्यमातून ही शाळा सुरु असून येथे अगदी लहान मुलांच्या शाळेसारखे हलकेफुलके वातावरण असते. सध्या डिजिटल युग असल्यानं या आजीबाईंना देखील स्वतःचं नाव, पत्ता सांगता यावा, मोबाईलमधील सोशल मीडियासारखे अॅप सहज हाताळता यावेत यासाठी देखील त्यांना प्रशिक्षण दिलं जातं.
अनेक आज्यांचं लहानपणीचं अधुर स्वप्न या शाळेच्या माध्यमातून साकार होत आहे. चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेचं यश पाहून याचा विस्तार आणखी वाढवण्याचं मनोगत यावेळी माधुरी पाटील यांनी व्यक्त केलं. पुढं त्या म्हणाल्या की, बालपणी शिक्षण घेण्याचं राहून गेलं असेल अशा आजीबाईंना येथे नक्कीच प्रवेश दिला जाईल. तसंच ठाणे महानगरपालिकेनं जर पुढाकार घेऊन आपल्या शाळांमध्ये असे वर्ग सुरू केले तर त्याला आपण सर्वतोपरी मदत करू, अशी तयारीही त्यांनी दाखवली.
300x450
300x600