जिल्हा

पावसाळ्यानंतरच फुटणार घोडबंदर मार्गाची कोंडी

पावसाळ्यानंतरच फुटणार घोडबंदर मार्गाची कोंडी
पावसाळ्यानंतरच फुटणार घोडबंदर मार्गाची कोंडी फोटो: ठाणे वैभव
रुंदीकरणाला वीजेचे खांब आणि जनित्राचे अडथळे
ठाणे: घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आले असले तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब आणि जनित्र मुख्य अडथळा ठरू लागले आहेत. हे अडथळे दूर होण्याकरिता आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात महापालिकेकडून निविदा मंजूर झाली असली तरी कामाचा व्याप पाहता हे काम पूर्ण करण्याकरता पावसाळा जाण्याची वाट पहावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने रुंदीकरणाच्या मार्गात येणारे किती अडथळे आहेत याचा लेखाजोखा महापालिकेकडे पाठवला असून त्यासाठी लागणारा अंदाजे खर्च देखील सुचवण्यात आला आहे. महापालिकेने देखील खर्चाचे टेंडर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या असून लवकरच हे अडथळे दूर करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र कामाची व्याप्ती पाहता हे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल अशी शक्यता असल्याने महामार्गाचे कोंडी फुटण्यासाठी पावसाळा जाण्याची वाट पहावी लागणार आहे.
घोडबंदर मार्ग वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक न्हावाशेवा या जागतिक बंदराला जोडण्यात आली असून घोडबंदरमार्गे गुजरात राज्यात आणि पालघरसह बोईसर, वसई आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होते. रोज सुमारे एक लाखांहून अधिक वाहने या मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण होणे ही अत्यंत आवश्यक बाब समजून शासनाने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहेत. दोन्ही बाजूकडील रस्त्याचे सहा पदरी मार्गात रूपांतर केले जात आहे. याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा रस्ते देखील मुख्य मार्गात विलीन करण्यात येत आहेत. सेवा रस्त्याचे काम 80 टक्के पर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरच येथील वाहतूक कोंडी फुटेल अशी चिन्हे दिसत असली तरी, या मार्गावर असलेल्या विद्युत तारा, लोखंडी खांब, जनित्र आदी अडथळे ठरत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागात आलेल्या विद्युत अडथळ्यांची पाहणी करून ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या माध्यमातून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
 विद्युत अडथळ्यांची माहिती एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेला दिली आहे. हे अडथळे दूर करण्याकरिता निविदा मंजूर झाली असून लवकरच ते दूर केले जातील असे मंडळाचे अभियंते आशिष गुप्ते यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या निधीमधून कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत खांबांचे काम झाले होते. मात्र आता सेवा रस्ते चुकीच्या पद्धतीने मुख्य रस्त्याला जोडले जात असल्याने पुन्हा विद्युत कामासाठी कोट्यवधींचा खर्चाचा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. रस्ता रुंदीकरणात नियोजनाचा अभाव असल्याने कोट्यवधींचा नाहक चुराडा होत असल्याची प्रतिक्रिया माजी उप महापौर नरेश मणेरा यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475