जिल्हा
लसणाची फोडणी महागली
लसणाची फोडणी महागली
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात लसणाची आवक घटल्याने दरात वाढ होत चालली आहे. घाऊक बाजारात लसूण महागला असल्याने किरकोळ बाजारात देखील चढ्या भावाने विक्री होत आहे. घाऊक बाजारात लसूण दर्जाप्रमाणे ८० ते २२० रुपये प्रती किलो विकला जात असून किरकोळ बाजारात १२० ते ३०० रुपये प्रती किलोने विकला जात आहे.
महाराष्ट्रातील गावरान लसणाच्या लागवडीत गेल्या काही वर्षांपासून घट झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मध्यप्रदेशमधील लसूण उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजमितीला राज्यातील सर्वच बाजार आवारात परराज्यातील आवक घटली आहे. मुंबई आणि उपनगरात लसणाला मोठी मागणी आहे. मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी प्रमाणावर होत गेल्याने बाजारात लसणाचे दर वधारले आहेत.
वाशीतील एपीएमसी बाजारात याआधी सरासरी आठ ते १० गाड्या दाखल होत होत्या, आता मात्र लसणाच्या दिवसाला दोन गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे मागणीप्रमाणे आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत चालली आहे. नवीन लसूण चवीला फिका वाटत असल्याने बाजारात नवीन लसणापेक्षा जुन्या लसणाला अधिक पसंती असते. मात्र मागणीप्रमाणे जुन्या लसणाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जेवणातील लसणाची फोडणी अधिक महाग झाल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.
वाशीतील एपीएमसी बाजारात अफगाणमार्गे चीनमधील लसूण दाखल होत असतो. लसूण आकाराला मोठा मात्र चवीला फिका असल्याने सर्वसामान्य ग्राहक या लसणाला पसंती देत नाहीत. मात्र हॉटेल व्यावसायिकांकडून या लसणाला अधिक मागणी असते. सध्या या लसणाची आवक देखील तुरळक असून चिनी लसणाला १५० ते २०० रुपये दर मिळत आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475