जिल्हा
रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे बाजारात
रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे बाजारात
फोटो: ठाणे वैभव
विक्रेत्यांना एफडीएचा गंभीर इशारा
ठाणे : विविध प्रकारची फळे पिकवून ती ग्राहकांना विकणा-या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर पावले उचलली असून, त्यांनी इथलीनचा वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध सक्त, गंभीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, कल्याण व नवी मुंबईतील घाऊक बाजारात तसेच अन्य बाजारांमध्ये आंबे आणि अन्य फळांची दररोज आवक होत असल्याने बरेचसे विक्रेते विविध फळे औषधाने पिकवत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे एफडीएच्या अधिका-यांना हे पाऊल उचलावे लागले. तरीदेखील काही विक्रेते/ प्रक्रिया करणारे प्रतिबंधित केलेला कॅल्शियम कार्बाइडचा वापर करतात किंवा निर्दिष्ट केलेल्या इथलीन वायूच्या स्त्रोतांमध्ये प्रत्यक्ष फळे बुडवून पिकवितात. त्यामुळे अशी फळे मानवी सेवनासाठी असुरक्षित आहेत, असे अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. संबंधित आदेशाचे कडक पालन करणे बंधनकारक असून प्रतिबंधित द्रव्याचा वापर करणे अथवा निर्धारित द्रव्याचा अयोग्य वापर फळे पिकविण्यास करू नये. असे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा 2011 व नियमानुसार सक्त व गंभीर कारवाई केली जाणार आहे.
मसाला लावलेला किंवा चुकीच्या पद्धतीने फळे पिकवणारे विक्रेते ग्राहकांच्या निदर्शनास आले तर त्यांनी ही बाब राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त किंवा प्रादेशिक संचालक, केंद्रीय अन्न संरक्षा व मानके प्राधिकरणाच्या कार्यालयाला कळवावी. नियमाचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करता येणार आहे. याकरीता सर्व राज्यांच्या अन्नसुरक्षा आयुक्तांचा व प्रादेशिक संचालकांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती एफडीएच्या अधिका-यांनी दिली.
फळे पिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून ज्यायोगे ग्राहकांना फळे ही खाण्यायोग्य, स्वादिष्ट ,रुचकर आणि पौष्टिक उपलब्ध होतात. कृत्रिमरीत्या फळे पिकवण्याची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये फळे सुनियंत्रित व कृत्रिमरीत्या पिकवली जातात. अशी पिकवल्यावर ती मऊ व नाशवंत होतात. नुकसान टाळण्यासाठी फळे कच्च्या स्थितीत दूरच्या ठिकाणी नेली जातात आणि विक्रीपूर्वी बाजारपेठेत कृत्रिमरित्या पिकवली जातात. आर्सेनिक आणि फॉस्फरस या घटकांच्या अंशामुळे अशी फळे मानवी आरोग्यास धोकादायक आहेत.
कॅल्शियम कार्बाइडमधून उत्सर्जित होणारा अॅसिटायलीन वायू हा फळे हाताळणा-यांनासुद्धा घातक ठरू शकतो. त्यातून उत्सर्जित होणारे आर्सेनिक व फॉस्फरस यांचे अंश फळाच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असल्यामुळे रासायनिक प्रक्रियेने फळे पिकविण्यास प्रतिबंध केला आहे. प्राधिकरणाने कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी अन्य द्रव्याचा 100 पीपीएमएवढी मात्रा वापरण्यास मान्यता दिली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475