संपादकीय

ब्रँडची शंभरी

ब्रँडची शंभरी
ब्रँडची शंभरी फोटो: ठाणे वैभव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्याची चर्चा रंगात आली आहे. बाळासाहेब हेच एकमेव ब्रॅण्ड होते असे सांगणारा भाजपा मुंबईचे महापौरपद बाळासाहेबांच्या आदरापोटी सोडेल काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात प्रत्यक्ष राजकारण आणि बाळासाहेबांबाबत असलेल्या संवेदना यांचा समन्वय होईल अशी आजची राजकीय भूमी नाही. त्यामुळे शिवतीर्थावर जाऊन दिवंगत सेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यापलिकडे महाराष्ट्रातील नेते काही वेगळे करतील ही शक्यता दुर्मिळच! ठाण्याचे आणि बाळासाहेबांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या हृदयाजवळ ठाणे होते असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही. वसंतराव मराठे यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष ठाण्यातूनच निवडला गेला होता. मुंबईत भगवा त्यानंतर फडकला होता. त्यामुळे ठाणे हेच बाळासाहेबांचे पहिले प्रेम राहिले, ते अगदी शेवटपर्यंत. प्रकृती साथ देत नसताना त्यांनी सेंट्रल मैदानात प्रचारसभा घेतली आणि अत्यंत भावनाविवश होऊन ठाणेकरांना 'उद्धवला साथ द्या' अशी साद घातली होती. त्यांची असंख्य भाषणे ठाण्यात झाली आणि ठाणेकरांनी त्यास प्रचंड प्रतिसाद दिला. ठाणेकर आणि ठाकरे अशी एक जबरदस्त 'केमिस्ट्री' होती, हे या विराट सभांतून दिसत असे. बाळासाहेबांची राजकीय भाषणे तुफान शाब्दिक कोट्या आणि विपक्षांवर आसूड ओढल्यामुळे शिवसैनिकांना ऊर्जा देऊन जात असे यात वाद नाही. त्यांचे परखड विचार आणि ठाकरी शैली यांचे गारुड महाराष्ट्रातील जनतेवर अनेक वर्षे चालले. शिवसेनेच्या आक्रमक प्रतिमेमागे हा ज्वालामुखी होता, असे म्हणणे वावगे ठरू नये. परंतु साहित्य, संगीत आणि चित्रपट-नाटक आदी कलांचा आस्वाद घेणारे आणि व्यंगचित्रकाराच्या चष्म्यातून समाजातील उपहासावर कुंचल्याचे फटकारे ओढणारे 'कलाकार' बाळासाहेब सुसंस्कृत महाराष्ट्राची पताकाही खांद्यावर घेऊन वावरले. त्यांची सामाजिक-सांस्कृतिक व्यासपीठावरील अराजकीय भाषणेही मंत्रमुग्ध करणारी होती. 'ठाणेवैभव'च्या तपपूर्तीनिमित्त (१९८७) बाळासाहेब सपत्नीक मीनाताईंबरोबर गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. 'ठाणेवैभव'कार कै.नरेंद्र बल्लाळ आणि बाळासाहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 'मार्मिक'च्या सुरुवातीपासूनच कै.नरेंद्र बल्लाळ विनोदी लेखन करीत. त्यामुळे आपल्या जुन्या स्नेह्याचे कौतुक करण्यासाठी ते ठाण्यात आवर्जून आले. विशेष म्हणजे बाळासाहेबांनी चाळीस मिनिटांच्या भाषणात केवळ पत्रकारितेवर विचार मांडले. त्यात राजकारणाचा लवलेशही नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळचे पत्रकारांचे योगदान असे सूत्र पकडून बाळासाहेबांनी 'काळ'कार शिवरामपंत परांजपे यांचा अफलातून किस्सा सांगितला. शिवरामपंतांनी 'काळ'मधून ब्रिटिशांवर आसूड ओढले होते. त्यामुळे चिडलेल्या गोऱ्यांनी परांजपे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून १९ महिन्यांच्या सश्रम कारावासात ठेवले. सुटून आल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी गावकरी जमले होते. परांजपे यांची अवस्था जर्जर झाली होती. अशा पत्रकारांकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले होते. आजही त्यांचे ते भाषण ऐकून अंगावर काटा येतो. त्यांचे ते शब्द आणि आजच्या पत्रकारितेला आलेला सवंगपणा यांची सांगड घातली तर 'काळ' खूप बदलला आहे असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांमुळे अनेकदा विचाराचे अंगार श्रोत्यांना मिळत. त्याचे किती सोने झाले हा प्रश्न जन्मशताब्दी सुरू होताना अस्वस्थ करून जातो.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475