संपादकीय

भावी नगरसेवकांचे चेहरे

भावी नगरसेवकांचे चेहरे
भावी नगरसेवकांचे चेहरे फोटो: ठाणे वैभव
ठाकरे बंधूंनी केलेले भावनिक आवाहन आणि महायुतीने सादर केलेला जाहीरनामा यांमुळे मतदानपूर्व रविवार गाजला. अदानी उद्योगसमुहाचे वाढते प्राबल्य आणि त्यांना प्रोत्साहन मिळणे हा मोठ्या कटाचा डाव असून ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची ठरेल, असे सांगून राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना साद घातली. उद्धव ठाकरे यांनीही मुंबईचे बॉम्बे करुन येथील मराठीपण पुसण्याची योजना आखली जात असल्याचे सांगितले. एकीकडे टीकेचा भडीमार सुरु असताना महायुतीने वचननामा जाहीर केला आणि सवलती जाहीर करुन ठाकरे-बंधूंचे भावनिक आवाहन निकामी करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे बंधूंच्या सभेमुळे मराठी मतदारांची मानसिकता अनुकूल झाली तर महायुतीची डोकेदुखी वाढू शकते. अर्थात भाजपा आणि शिवसेना यांची एकत्रित सभा वातावरणनिर्मिती करु लागल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होऊ लागली आहे. अशा सभा प्रचाराच्या सुरुवातीस होणे आवश्यक होते. मतदारांना विचार करायला वेळ मिळाला असता. ठाकरे यांच्या आवाहनांसमोर महायुतीचा वचननामा आल्यामुळे मतदार ठाकऱ्यांच्या वचननाम्याशी तुलना करणार. विपक्षांवर प्रचारसभेत टीका तर होणारच. परंतु मतदानाची घडी समीप येत असताना विकासाचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो. ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे, याचे कारण आर्थिक सत्तेत दडले आहे. मुंबईसारखी महाकाय महापालिका आणि तेथे होणारी वार्षिक उलाढाल लक्षात घेता नियंत्रण आपल्याच हाती राहावे ही महायुतीची अपेक्षा असणार. परंतु नागरिकांचे प्रश्न सोडवताना अर्थकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व मिळायला हवे. तसे होताना या प्रचारादरम्यान दिसले नाही. गद्दार, खोके, भ्रष्टाचार, पक्ष आणि चिन्ह चोरी तसेच नेतृत्वातील पोकळपणा हेच दाखवण्यात सर्व पक्षांनी यथेच्छ शक्ती खर्च केली. ती वायाच गेली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. घराणेशाही, भ्रष्टाचार वगैरेपासून कोणताच पक्ष अलिप्त राहिलेला नाही. त्यामुळे प्रचाराचे धुके कमी होत चालले असले तरी नेमके कोणाला मत द्यायचे हे काही ठरत नाही. भावी नगरसेवकांचे चेहरे अजूनही धुसर आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475