संपादकीय

महापौरांचे मूल्यांकन हवे

महापौरांचे मूल्यांकन हवे
महापौरांचे मूल्यांकन हवे फोटो: ठाणे वैभव
महापौरपदावरील व्यक्तीला कार्यकारी अधिकार नसले तरी शहराची प्रतिमा उंचावण्याचे काम ती जरूर करू शकते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा महापौरांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याने सभागृहातील चर्चा आणि त्यानंतर होणारे निर्णय यांच्याशी महापौरांचा थेट संबंध असतो. शहराची जडणघडण, प्रकल्पांबाबतचे धोरण, आर्थिक नियोजनावरील तरतूद आदी विषयांचे सखोल ज्ञान महापौरांकडे असले तर प्रथम नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदास प्रतिष्ठा देण्याचे काम त्यांच्याकडून अपेक्षित असते. सव्वा वर्षाचे महापौरपद ही राजकीय सोय असते. एवढ्या अल्पकाळात संबंधित व्यक्ती वरीलप्रमाणे व्यक्त झालेल्या अपेक्षांना न्याय देईल काय, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. पाच वर्षांत चौघांची सोय होत असली तरी शहराची सोय पाहिली जाते का? हा खरा प्रश्न आहे. सव्वा वर्षात पायउतार झालेली महापौरपदावरील व्यक्ती आयुष्यभर माजी महापौर म्हणून वावरू शकते, परंतु महापौर म्हणून त्यांच्या हातून कोणती कामगिरी झाली हे सांगण्यासारखे काही असते का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नकारात्मक आहे. त्यामुळे मुळात शोभेचे पद आणखी शोभेचे होऊन जाते आणि शहारातील नागरिकांना त्याचा कोणताच परिणाम दिसत नाही. मोठ्या खंडानंतर सर्वच महापालिकांत लोकप्रतिनिधींची राजवट आली आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून आणि अर्थातच महापौरांकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. त्याचा विचार राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करतात काय, हा कळीचा मुद्दा आहे. ठाण्याच्या प्रथम नागरिकांची एक परंपरा आहे. तिला इतिहास आहे. अनेकदा सभागृहनेतेपद भूषविलेल्या व्यक्ती महापौर झाल्याचे आपण पाहिले आहे. अलिकडे प्रथा आपण बासनात बांधून ठेवली आहे. महापौरपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीकडे नगरसेवकांचे नेतृत्व करण्याचे कोणते गुण आहेत, हे तरी तपासले जायला हवे. नवीन लोकांना संधी देण्याचे स्वागतच करायला हवे, परंतु मिळालेल्या संधीचे सोने कसे होईल हे सत्तारुढ पक्षांनी पाहायला नको का? पक्षाची प्रतिमा ही महापौरांप्रमाणे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या हाती असते. प्रत्येक पदाची एक जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची क्षमता त्या व्यक्तीत आहे काय, हे तपासून उमेदवार ठरवायला हवा. आमची नेत्यांना एक सूचना आहे की सव्वा वर्षाप्रमाणे चार महापौर बसवण्याऐवजी तिघांना संधी जरुर द्या, परंतु चौथी सव्वा वर्षाची टर्म या तिघांपैकी ज्यांनी महापौरपदाला न्याय दिला अशा व्यक्तीला द्यायला हवी. तरच महापौरपदाची प्रतिष्ठा जपली असा अर्थ होईल.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600