जिल्हा
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू
फोटो: ठाणे वैभव
मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश करण्यासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तोकड्या कपड्यांमध्ये असलेल्या कुठल्याही भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यापासून ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.
मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतो आहे, अशा काही तक्रारी सातत्याने मंदिर प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळेच सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडले होते. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकाचा पेहराव हा मंदिराचे पावित्र्य जपणारा असला पाहिजे, त्या पेहरावामुळे कुणालाही संकोच वाटू नये. अशा प्रकारचा पेहराव कुणी केला तर त्या भाविकाला मंदिर न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही. याचाच अर्थ मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल अशा कपड्यांवर आणि तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे असे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी योग्य अंगभर कपडे परिधान करुन मंदिरात प्रवेश करावा. भाविकांचा पेहराव हा मंदिराचं पावित्र्य राखणारा असला पाहिजे. शॉर्ट्स, शॉर्ट स्कर्ट, अंग प्रदर्शन करणारे कपडे किंवा तोकडे कपडे घातलेल्या भाविकांनी मंदिरात प्रवेश करु नये, त्यांना अशा कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय संस्कृतीला साजेसे कपडे परिधान करुनच मंदिरात प्रवेश करावा. कुठलेही अशोभनीय कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475