जिल्हा
ठाण्यात बांधकाम कचऱ्यावर डिजिटल पोर्टलची नजर
ठाण्यात बांधकाम कचऱ्यावर डिजिटल पोर्टलची नजर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे शहरात बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे उद्घाटन बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक नगररचना कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद (सीईईडब्ल्यू) संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेने ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद (सीईईडब्ल्यू) यांच्या सहकार्याने बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या सी अँड डी कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करता येणार आहे. हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम आराखडा व्यवस्थापन प्रणालीशी संलग्न असून, बांधकाम परवानगी घेताना विकासकांना बांधकाम कचरा व्यवस्थापन शुल्क भरणे, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणे तसेच निर्माण झालेल्या आणि प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची माहिती ऑनलाइन नोंदविणे बंधनकारक राहणार आहे.
या प्रणालीमुळे बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यास मदत होणार असून, धूळ प्रदूषण व हवा प्रदूषण कमी करण्यासाठीही ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये बांधकामाचा कचरा साचून पाणी तुंबणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यासही या पोर्टलची महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. या पोर्टलमुळे बांधकाम कचऱ्याचा संपूर्ण मागोवा घेणे शक्य होणार असून, कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. ठाणे शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी हे पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
300x450
300x600