जिल्हा

ठाण्यात डेंग्यू फणफणू लागला

ठाण्यात डेंग्यू फणफणू लागला
ठाण्यात डेंग्यू फणफणू लागला फोटो: ठाणे वैभव
Thanevaibhav Online 5 October 2023 आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानंतर आरोग्य यंत्रणा सावध ठाणे: ठामपा हद्दीतील उथळसर, बाळकुम, आयुर्वेदिक दवाखाना व कळवा विभागातील आतकोनेश्वर नगर येथे डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे तर सी आर वाडिया दवाखान्यातही रूग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती केंद्रे कोणती, त्यामागची कारणे काय आहेत, याचा शोध घेऊन तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. पावसाळा अजून संपलेला नसल्याने अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने अशा ठिकाणांमधून डासांची व्युत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू आहे, पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे 15 दिवस हे महत्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबरपर्यत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क रहाण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे झालेल्या बैठकीत दिले. त्या-त्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱी यांनी शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्स तसेच लॅब यांनी त्यांच्याकडे डेंग्यू, मलेरिया सदृश्य आजाराचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्वरीत त्याची माहिती त्याच दिवशी स्थानिक वैद्यकीय अधिकारी व मुख्यालय आरोग्य अधिकारी यांना कळविली जाईल या दृष्टीने त्यांना सजग करावे असेही आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले. प्राप्त झालेल्या डेंग्यू रुग्णांच्या अहवालानुसार सी.आर.वाडिया दवाखाना येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विभागातील रुग्णवाढीची कारणे काय आहेत, या ठिकाणी रुग्णांची वाढत आहे, त्या अर्थी डासांची व्युत्पत्ती स्थाने असू शकतात. त्यामुळे डासाची व्युत्पत्ती स्थाने शोधून या ठिकाणी धूर व औषध फवारणी करुन ती नष्ट करण्यात यावी यासाठी फायलेरिया विभागाचा सहभाग महत्वाचा असून त्यांच्यामार्फत प्रभावीपणे कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या. उथळसर, बाळकुम, आयुर्वेदिक दवाखाना व कळवा विभागातील आतकोनेश्वर नगर येथे रुग्णांची संख्या वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. या विभागात देखील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन करुन कार्यवाही करावी. तसेच आतकोनेश्वर नगर येथे साथ सर्वेक्षण अधिक परिणामकारित्या करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीस उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना के., माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475