जिल्हा

दौलतनगरच्या पुनर्विकासाचे फटाके!

दौलतनगरच्या पुनर्विकासाचे फटाके!
दौलतनगरच्या पुनर्विकासाचे फटाके! फोटो: ठाणे वैभव
विकासक बदलण्याची दमानिया यांची मागणी ठाणे: ठाणे पूर्व कोपरी येथील दौलत नगर को. ऑप. हाउसिंग सोसायटीच्या पुनर्वसनाच्या प्रकरणात समाजसेविका अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. पुनर्विकासासाठी निवड करण्यात आलेला विकासकच बदलण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. दौलत नगरचा विकास करण्यासाठीका लक्ष्मण कदम यांची विकासक म्हणून निवड करण्यात आली असून संबंधित विकासक रहिवाशांवर लादले आहेत असा आरोप दमानिया यांनी केला आहे. तर दुसरीकडे या विकासकाची एकमताने निवड करण्यात आली असून पुढच्या महिन्यापासून पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होईल, असा दावा विकासकाकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी समाजसेविका अंजली दमानिया यांनी दौलत नगर येथील रहिवाशांची भेट घेतली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. चांगल्या इमारती असूनही त्या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आणि अक्षरशः ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागले. रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत मी अनेकवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेसेज केले, फोन देखील केले आहेत. या प्रकल्पासाठी ज्या विकासकाची निवड करण्यात आली आहे तो विकासक बदलून मोठ्या विकासकांना या पुनर्विकासाचे काम देण्यात यावे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. यासंदर्भात आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील दूरध्वनीवरून बोलणे झाले असून त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी एकीकडे विकासक बदलण्याची मागणी केली असली तरी या विकासकाची निवड ही रहिवाशांनी एकमतानेच केली असल्याचा दावा सोसायटीचे सभासद जयप्रकाश कोटवानी यांनी केला आहे. सर्व रहिवाशी आपल्या बाजूने असून काही ठराविक लोकांचे मतभेद असतील तर ते दूर केले जातील, असे कोटवानी यांनी सांगितले. अंजली दमानिया यांनी ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेतली, यावेळी काही रहिवासी दमानिया यांच्या बाजूने उभे राहिले तर दुसरीकडे विकासकाला पाठिंबा देण्यासाठी देखील मोठ्या संख्येने रहिवासी उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या नऊ महिन्यांपासून या रहिवाशांना विकासकाकडून भाडे मिळाले नव्हते. मात्र दमानिया यांनी पत्रकार परिषद घेताच रहिवाशांना भाड्याचे धनादेश वाटण्यात आले. सभासदांकडून मात्र हा योगायोग असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाडे मिळाल्यानंतर यावेळी ढोल वाजवून फटाके देखील वाजवण्यात आले. पुढच्या महिन्यापासून पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचा दावा देखील कोटवानी यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475