जिल्हा
धोकादायक इमारतीची पडझड, उल्हासनगरमध्ये एकाचा मृत्यू
धोकादायक इमारतीची पडझड, उल्हासनगरमध्ये एकाचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगरातील फर्निचर बाजारात एका जीर्ण धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
फर्निचर बाजारातील माया हॉटेल शेजारी ही इमारत होती. या प्रकारामुळे धोकादायक इमारतींसह आसपास असणाऱ्या नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर शहरातील फर्निचर बाजारात माया हॉटेलच्या शेजारी असलेल्या जीर्ण आणि धोकादायक अवस्थेतील इमारतीत रविवारी सायंकाळी पडझड झाली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून सज्जा कोसळून खाली काम करत असलेल्या एका कामगारावर आदळला. या दुर्घटनेत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत कामगाराचे नाव रावसाहेब नंदनवरे असे असून, ते या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपासून कार्यरत होते. घटनेच्या वेळी रावसाहेब आणि इतर काही कामगार अरुंद जागेत उभे राहून बांधकाम करत होते. त्याचवेळी अचानक वरून खिडकीचा मोठा सज्जा तुटून थेट रावसाहेब यांच्या डोक्यावर कोसळला. यानंतर तातडीने रावसाहेब यांना उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी माया हॉटेलचे मालक महेश साधवानी यांच्यावर रावसाहेब नंदनवरे यांच्या नातलगाने दिलेल्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सुरक्षा साधने न पुरवता कामगारांना कामाला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
300x450
300x600