जिल्हा
कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून रुग्णाला नवजीवन
कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून रुग्णाला नवजीवन
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यातील डॉक्टरांकडून ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली शस्त्रक्रिया
ठाणे: मालाड येथील ५२ वर्षांचे धिवाजी धुरत यांचे आयुष्य हळूहळू मर्यादित होत चालले होते. काही अंतर चालणे, जिना चढणे किंवा किराण्याच्या पिशव्या उचलणे यांसारखी साधी कामे करतानाही त्यांना छातीत दुखणे आणि श्वास लागण्याचा त्रास होऊ लागला होता. ठाण्यातील किम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून रुग्णाला नवजीवन दिले.
१५ वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी झाली असल्याने पुन्हा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाली असावी, अशी त्यांना भीती वाटत होती. काही आठवड्यांत हा त्रास वाढू लागल्याने त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतला. तपासणीत डॉक्टरांना धक्कादायक बाब समोर आली. १५ वर्षांपूर्वी हृदयाच्या रक्तवाहिनीत बसविण्यात आलेला स्टेंट पुन्हा मोठ्या प्रमाणात अरुंद झाला होता. या स्थितीला इन-स्टेंट रिस्टेनोसिस असे म्हणतात. याशिवाय हृदयाच्या इतर दोन रक्तवाहिन्यांमध्येही गंभीर अडथळे आढळून आले. अशा रुग्णावर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक होते.
सुरुवातीला पारंपरिक अँजिओप्लास्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रक्तवाहिनीतील अडथळा इतका कठीण आणि दाट होता की, नियमित बलून आणि कॅथेटरच्या मदतीने तो दूर करणे शक्य झाले नाही. पारंपरिक उपचारपद्धतीने अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होती. या परिस्थितीत किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस विभागातील तज्ज्ञांनी ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. या अत्याधुनिक प्रक्रियेमध्ये अल्ट्राव्हायोलेट लेझरच्या साहाय्याने रक्तवाहिनीतील व्रणयुक्त ऊतक (स्कार टिश्यू), कठीण प्लाक आणि जुन्या रक्ताच्या गाठी (ऑर्गनाइज्ड थ्रोम्बस) सूक्ष्म पातळीवर नष्ट करून त्यानंतर अँजिओप्लास्टी पूर्ण केली जाते.
ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया डॉ. बी. सी. कलमठ, संचालक व प्रमुख, कार्डियाक सायन्सेस विभाग, किम्स हॉस्पिटल्स, ठाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेद्वारे पूर्वीच्या स्टेंटमधील अडथळा दूर करून रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात आला. त्याचबरोबर हृदयातील इतर दोन गंभीर अडथळ्यांवरही त्याच वेळी यशस्वी उपचार करण्यात आले.
शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच श्री. धुरत यांची प्रकृती स्थिर झाली आणि अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. केवळ २४ तासांपूर्वी अशी जलद प्रकृती सुधारणा होईल, याची कल्पनाही करणे कठीण होते.
300x450
300x600