जिल्हा
मीरा-भाईंदरचा वादग्रस्त उड्डाणपूल विधानसभेत
मीरा-भाईंदरचा वादग्रस्त उड्डाणपूल विधानसभेत
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा-भाईंदरमधील मेट्रो-९ मार्गिकेखालील गोल्डन नेस्ट सर्कल येथील दुमजली उड्डाणपुलाच्या रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा पूल चार मार्गिकांवरून अचानक दोन मार्गिकांचा होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विधानसभा अधिवेशनात या वादग्रस्त उड्डाण पुलाबाबत शिवसेना (उबाठा) आ. आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी याला 'नियोजनशून्य कारभार' आणि 'अपघाताचे निमंत्रण' म्हटले आहे. एमएमआरडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जागेच्या कमतरतेमुळे सध्या दोन मार्गिका आहेत, परंतु भविष्यात रेल्वे ओव्हरब्रिजच्या विस्तारासह हा प्रश्न सुटेल. वाढत्या टीकेनंतर या पुलाचे 'रोड सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलाच्या अरुंद भागावर रिफ्लेक्टर्स आणि रंबल स्ट्रिप्स लावण्याचे काम सुरू आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याअगोदर सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण केल्या जात आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो ९ मार्गिकेसोबत उभारण्यात आलेला हा 'डबल डेकर' उड्डाणपूल सध्या त्याच्या दोषपूर्ण आराखड्यामुळे चर्चेत आहे. दीपक हॉस्पिटल ते भाईंदर फाटक या दरम्यानचा हा पूल अचानक अरुंद होत असल्याने त्याला 'बॉटलनेक' म्हटले जात आहे.
हा उड्डाणपूल सुरुवातीला चार मार्गिकांचा (४ लेन) आहे, मात्र भाईंदर पूर्वेकडे उतरताना तो अचानक दोन मार्गिकांचा होतो. वेगाने येणारी वाहने अचानक रस्ता अरुंद झाल्यामुळे एकमेकांवर धडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी आणि विरोधकांनी व्यक्त केली आहे. हा पूल वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधला असला तरी, अरुंद रस्ते अधिक कोंडी निर्माण करतील असा आरोप होत आहे. या मुद्द्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी आणि एमएमआरडीए प्रशासनाला धारेवर धरले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी याला "भ्रष्टाचाराचा नमुना" आणि "नियोजनाचा अभाव" म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पुलाच्या मंजुरीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, हा पूल मविआ सरकारच्या काळात मंजूर झाल्याचे सांगत सत्ताधारी गटाने विरोधकांच्या कोर्टात टोलवला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या पुलाच्या रचनेवर प्रश्न उपस्थित करत सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचा दाखला दिला आहे आणि हा पूल प्रवाशांसाठी 'डेथ ट्रॅप' ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
300x450
300x600