जिल्हा
कस्तूरी हाईट्स इमारतीच्या आगीवर नियंत्रण; मोठी दुर्घटना टळली
कस्तूरी हाईट्स इमारतीच्या आगीवर नियंत्रण; मोठी दुर्घटना टळली
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: भाईंदर पूर्वेकडील कस्तूरी हाईट्स, इंद्रलोक फेज ६, इमारतीच्या इलेक्ट्रिक डकला लागलेल्या आगीवर मीरा-भाईंदर अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कनकिया अग्निशमन स्थानकास सकाळी ११:३० वाजता खबर प्राप्त झाली. कस्तूरी हाईट्स, इंद्रलोक फेज ६, आर. बी. के. स्कूल समोर भाईंदर (पूर्व) येथे आग लागल्याची माहिती प्राप्त होताच तत्काळ घटनास्थळी कनकिया अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असता सदरची आग ही कस्तूरी हाईट्स या इमारतीच्या इलेक्ट्रिक डकला लागल्याचे निदर्शनास आले. तत्काळ या आगीवर अग्निशमन वाहनांच्या साह्याने होजची लाईन टाकुन आग विझविण्यास सुरुवात केली.
इमारतीमधील रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिमांश भट (अडीच वर्षे), प्रियंका सिंग, अर्पण सिंग, वैभव सिंग, चंद्रिका देवी सिंग, पाल फॅमिलि, त्यांना अनुक्रमे शालोम रुग्णालय, पंडित भिमसेन जोशी रुग्णालय व भक्तिवेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही आग इमारतीच्या इलेक्ट्रिक डकपासून इमारतीच्या वरच्या बाजूस आगीचा आवाका वाढत असल्याने तत्काळ स्व. कल्पना चावला अग्निशमन स्थानक, सिल्वरपार्क अग्निशमन स्थानक व नवघर अग्निशमन स्थानक या तीन अग्निशमन स्थानकातील अधिकारी व कर्मचारी यांना अग्निशमन वाहनांसह पाचारण करण्यात आले. त्या इमारतीमधील अदानी इलेक्ट्रिसीटी कर्मचा-यांना पाचारण करुन विद्युत पुरवठा तत्काळ खंडीत केला त्याचबरोबर महानगर गॅसच्या कर्मचा-यांना पाचारण करुन तेथील गॅस पाईप लाईन देखील तत्काळ बंद केली. आगीचे वाढते प्रमाण व निर्माण झालेल्या धूरामुळे इमारतीमधील अंदाजे २१५ लोकांना तत्काळ इमारतीमधून सुरक्षितपणे बाहेर काढून इमारत खाली करण्यात आली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475