जिल्हा
स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचे स्वबळाचे संकेत
स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचे स्वबळाचे संकेत
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ठाण्यात दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकण विभागातील महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने जिल्हा आणि तालुका पातळीवर आघाडीचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक संघटनांना दिले असल्याचे सांगताना, प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर आघाडीचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोकणात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले वातावरण होते. परंतु युती आघाडीचा धर्म पाळल्यामुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले.
दरम्यान, आता पक्ष विस्तार कसा करता येईल, कार्यकर्ता असतांनाही आम्ही न लढल्यास त्याची किमंत पक्षाला मोजावी लागेल. स्थानिक पातळीवर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका असेल त्या ठिकाणांच्या पदाधिकाऱ्यांना युती, आघाडी घेण्याचा निर्णय घेण्याबाबत अधिकार दिले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मित्र पक्षांबरोबर वाटाघाटी करुन त्या दृष्टीने युती आघाडीचा निर्णय घ्यावा, असेही सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
300x450
300x600